श्री दत्तबावनी मराठी

श्री दत्तबावनी मराठी

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥ अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥ ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥ अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥ काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥ कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥ आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥ ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥ दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥ केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब । । १०॥ विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥ जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥ पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥ ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥ घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥ बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥ ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥ धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥ पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥ स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥ पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥ सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥ वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥ वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥ निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥ दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥ घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥ ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥ पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥ अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥ तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥ एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥ तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥ हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥ राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥ शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥ अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥ आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥ मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥ डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥ पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥ करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥ साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥ राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥ नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥ यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥ अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥ सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥ वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥ थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥ अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥ तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥ ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ मराठी अर्थ हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस. अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस. तु ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस. तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस. तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे. कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस. मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पुर्वी तु सहस्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. विष्णुशर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल? आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रह्लादाला तु उपदेश केला होता. अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राह्मणशेठला वाचवलेस. मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा! वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस. दत्तात्रेय प्रभू! तु ब्राह्मणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस. हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत. श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस. पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जीवंत केलास. हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस. हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली. हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस. हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस. दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही? हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात. जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत. दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे. हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित! जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा? दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल. श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ``जय जय श्री गुरुदेव'' म्हणावे Translation from original Gujarati text composed by Shri Ranga Avadhuta Swami
% Text title            : dattabAvanI in marAThI
% File name             : dattabAvanImarAThI.itx
% itxtitle              : dattabAvanI marAThI (ra.ngaavadhUtasvamI rachita gujarAthI)
% engtitle              : dattabAvanI in marAThI
% Category              : deities_misc, dattatreya, marAThI
% Location              : doc_deities_misc
% Sublocation           : deities_misc
% SubDeity              : dattatreya
% Author                : Ranga Avadhuta Swami
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Description/comments  : Originally composed in Gujarati
% Indexextra            : (English, sArtha, ranga avadhUta svAmI)
% Latest update         : August 22, 2020
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org