पसायदान
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ २॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९॥
ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी १७९४-१८०२