श्री अष्टविनायकस्तोत्रं माहात्म्यसहितम् (मराठी)

श्री अष्टविनायकस्तोत्रं माहात्म्यसहितम् (मराठी)

श्रीगणेशाय नमः । ॥ श्री अष्टविनायकस्तोत्रम् ॥ स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिन्तामणिस्थेवरे । लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ॥ इति श्री अष्टविनायकस्तोत्रं सम्पूर्णम् ।

माहात्म्य

ॐ गँ गणपतये नमः । ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरी नंदना । विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ॥ नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥ नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पाया । चित्त शुद्ध जाहले ॥ थोर महात्मे संतजन । बुधगण आणि सज्जन । करून त्यांसी नमन । ग्रंथरचना आरंभिली ॥ अष्टविनायकाचे मंगल स्तोत्र । आणि त्याचे माहात्म्य पवित्र । दोन्ही याच ग्रंथी एक । मिलिंद माधवे रचिली ॥ अष्टविनायकांची आठ नावें । एक एक नाम मनी जपावे । आणि चरणी नम्र व्हावे । नमन भावे करूनि ॥ मोरगांवस्थित मयुरेश्वराय नमः । सिद्धटेकनिवासी सिद्धिविनायकाय नमः । पालीक्षेत्रस्य बल्लाळेश्वराय नमः । महडवासी वरदविनायकाय नमः । थेऊरेश्वर चिंतामणी गणेशाय नमः । लेण्याद्री स्वामी गिरीजात्मकाय नमः । ओझरनिवासी विघ्नहराय नमः । रांजणग्रामाधीपती शंकर वरदाय नमः ॥ नंतर होऊनी स्थिरचित्त । बैसुनी आसनी ध्यानस्थ । स्मरतो मनी गिरीजासुत । विविध रुपी गणेश ॥ मूळारंभा गजानना । गणाधीशा प्रसन्न वदना । ब्रह्मरुपा मूषकवाहना । महोत्कटा गणपती ॥ चिंतामणी गणेश्वरा । ज्ञानरूपा मयुरेश्वरा । जगत्पालका परशुधरा । ॐकारा श्री चतुर्भुजा ॥ वक्रतुंडा लंबोदरा । धुम्रवर्णा सकल भयहारा । देवदेवेषा सिद्धीवरा । महाबला हेरंबा ॥ सुंदरवदना एकदंता । विकटा गंधर्व पूजिता । सुमुखा सांबसुता । मंगलमूर्ती मोरया ॥ नामे तूझी सहस्र । अशी अष्टरूपे परी । नटलासी आठ ठिकाणी । अवतरलासी भक्तजनां कारणे ॥ एक एक ते देवस्थान । स्वयंभू पुण्यक्षेत्र महान । करता स्मरण घेता दर्शन । इच्छा पूर्ण होतसे ॥ म्हणोनि व्हावे भाविक । नित्य स्मरावा गजमुख । धन धान्य ऐश्वर्य सुख । पुत्र पौत्र लाभती ॥

१. मोरगांव मोरेश्वर

ॐ गँ गणपतये नमः । पुणे जिल्ह्यात मोरगावी । जाऊन तेथे प्रचीती पहावी । मयुरेश्वराची थोरवी । उपासकां कळेल ॥ महिमा त्याचा फार मोठा । संकटे पळती चारी वाटा । सोडून अहंकार खोटा । कथा त्याची ऐकावी ॥ चक्रपाणी नामे राजा होता । परी त्याला पुत्र नव्हता । शौनक ऋषिने कृपा करता । पुत्र सिंधू जन्मला ॥ सिंधूने केले तपाचरण । प्रसन्न झाले सूर्यनारायण । आणि दिले अमृत भोजन । तेणे अमर झाला तो ॥ अमर होता उन्मत्त झाला । छळू लागला ज्याला त्याला । सर्व जिंकून देव लोकाला । वेढा त्याने घातला ॥ सिंधू येता देव भ्याले । जीव घेऊनि ते पळाले । श्री विष्णूंना प्रार्थू लागले । रक्षरक्ष म्हणोनि ॥ तेंव्हा उठले कमलापती । एकवटली सर्व शक्ती । आणि फेकली सिंधू वरती । गदा मोठ्या त्वेषाने ॥ सिंधू मग संतापला । तोंड लागले युद्धाला । अखेर त्याने श्री विष्णूंना । गंडकी नगरात ठेवले ॥ देव इंद्र सुरगण । कारागृही पडले डांबून । त्यांनी विनायक मूर्ती स्थापून । भक्ती भावे पूजिली ॥ ऐकून त्यांची प्रार्थना । विघ्नहर्ता गजानना । सर्वांची आली करुणा । आणि दिले वरदान ॥ त्या वरदानाप्रमाणे । सिंधूच्या नाशा कारणे । पार्वतीपोटी विनायकाने । अवतार घेतला ॥ बैसुनी मग मोरावरती । मयुरेश्वर तो गणपती । उभा ठाकला सिंधू पुढती । परशु हाती घेऊनी ॥ पाहता त्या विराट रुपाला । सिंधू राक्षस मनीं भ्याला । परशु प्रहारे कोसळला । क्षणात एका भूवरी ॥ अमृत मिळालेले सूर्याकडून । बाहेर पडता देहातून । सिंधू राक्षस गतप्राण । झाला ईश कृपेने ॥ सर्वांवरचे संकट टळले । देव जणू बंधमुक्त झाले । आनंदुनि ते म्हणाले । मयुरेश्वराय नमो नमः ॥

२. सिद्धटेक सिद्धिविनायक

ॐ गँ गणपतये नमः । दुसरा विनायक सिद्धटेकचा । सिद्धीदाता सर्वांचा । प्रतिपाळ करी भक्तांचा । सर्वदा सर्वतोपरी ॥ कथा त्याची बहू गोड । अलौकिक आणि अजोड । मना लागो सदा ओढ । पठणाची आणि श्रवणाची ॥ ब्रह्मदेवा गर्व झाला । सृष्टी तो निर्मू लागला । नाना संकटे त्या वेळेला । उभी समोर राहिली ॥ ब्रह्मदेव मनी उमजला । गणपतीला शरण गेला । अखंड जप सुरु केला । श्री गणेशाय नमः ॥ विनायक झाला प्रसन्न । दिधले प्रत्यक्ष दर्शन । आणि दिले वरदान । विघ्ने दूर पळाली ॥ गणेश म्हणाला ब्रह्मदेवाला । कार्यारंभी आठवी मला । सर्व कार्ये नेईन सिद्धीला । स्मरण मात्रे सर्वदा ॥ ऐकुन त्या वचनाला । धीर आला ब्रह्मदेवाला । नमन करुनी गणपतीला । विश्वरचना आरंभिली ॥ जाता ऐसा काही काळ । श्रीविष्णूंच्या कानाजवळ । दोन राक्षस विक्राळ । निर्माण झाले अवचित ॥ एक मधू कैटभ दुसरा । सर्वां होता त्यांचा दरारा । इंद्रा चंद्रा कुबेरा । थरकांप सुटतसे ॥ विष्णू उठला क्रोधाने । आणि त्या राक्षसांशी त्याने । अटीतटीचे चुरशींने । मल्लयुद्ध आरंभिले ॥ राक्षस होते कपटी मोठे । घेऊन रूप खोटेनाटे । डावपेच ते उफराटे । श्री विष्णूंशी खेळती ॥ सज्जनाशी असावे सज्जन । दुर्जनाशी असावे दुर्जन । हीच सत्यनिती समजून । वागावे सर्वदा ॥ म्हणून श्री विष्णूने काय केले । मल्लयुद्ध ते थांबवले । आणि आपण रूप घेतले । गायक गंधर्वाचे ॥ ऐकून त्याचे गोड गीत । पशु-पक्षी मानव समस्त । डोलू लागले झाले मोहित । प्रत्यक्ष श्री शंकर ॥ गंधर्व रुपी भगवान । सांगून सर्व वर्तमान । म्हणे प्रभो द्यावें वरदान । राक्षसा मारावया ॥ तेंव्हा म्हणे कैलासपती । अरे तू वेडा किती । पूजीला नाहीस गणपती । यश कैसे मिळेल ॥ यशदाता तो गजानन । तयासी जा तू शरण । झाल्यावरी तो प्रसन्न । सुयश तुला मिळेल ॥ ते ऐकून श्री विष्णूने । सिद्धीक्षेत्री शुद्ध मनाने । श्री गणेशाय नमः जपाने । तपश्चर्या आरंभीली ॥ प्रसन्न झाला गणपती । श्रीविष्णुनां झाली वरप्राप्ती । त्या राक्षसांवरी मागुती । प्रतिहल्ला चढविला ॥ हां हां म्हणता अखेरीस । बलाढ्य ते दोन्ही राक्षस । मुकले आपल्या प्राणास । विजयी झाले श्री विष्णू ॥ जिथे ही घटना घडली । ती भूमी पवित्र झाली । श्री विष्णूंना सिद्धी मिळाली । म्हणुनी नाव सिद्धटेक ॥ नगर जिल्ह्यात ते आहे क्षेत्र । प्रेक्षणीय आणि पवित्र । वास करत असे तिथे । श्री सिद्धीविनायक ॥

३. पाली बल्लाळेश्वर

ॐ गँ गणपतये नमः । आता तो तिसरा गणपती । बल्लाळेश्वर प्रसिद्ध अती । यथा शक्ती यथा मती । स्तवन त्याचे करावे ॥ कुलाबा जिल्हा सुधागड तालुका । पाली नामे ग्रामी एका । पाहावे तिथे विनायका । मनोभावे भजावे ॥ आहे सुरस त्याची कथा । भक्तीभावे ती पठण करता । किंवा श्रद्धेने परिसता । पुण्य लाभ होतसे ॥ एक पतिव्रता साध्वी होती । तिचे शुभ नाम इंदुमती । कल्याणशेट तिचा पती । दोघे सुखे नांदती ॥ भगवंताच्या कृपेने । त्यांना नव्हते काही उणें । परंतु त्यांच्या दुर्दैवाने । निपुत्रिक होते ते ॥ अनेक केली व्रत वैकल्ये । नवस सायासही बहू केले । परी इच्छित नाही साध्य झाले । अनेक वर्षे तयांचे ॥ इंदूमती एकदा माहेरी गेली । तिथे गणपतीची कथा ऐकली । त्या योगे प्राप्ती झाली । दिव्य पूत्र रत्नाची ॥ सुंदर गोंडस गोड बाळ । नाव तयाचे बल्लाळ । घेउनी या जप माळ । गणेश चिंतन करीतसे ॥ छोटे छोटे मित्र जमवून । करीतसे गणपती पूजन । आणि भजनी रंगून । तल्लीन खास होतसे ॥ नाही भूक नाही तहान । गणेश भक्ती रात्रंदिन । इतर लोक ते पाहुन । आठ्या कपाळा घालती ॥ म्हणती या द्वाड बल्लाळे । सर्व पोरांचे केले वाटोळे । याच्याच भिकार छंदामुळे । पोरे आमुची बिघडली ॥ ऐकून अशा तक्रारी । बल्लाळ पिता संतापला भारी । मुलाला बांधून मारी । गणेश पूजा उधळोनी ॥ सुकुमार त्या बाळ बल्लाळा । मार तो असह्य झाला । कळवळून बेशुद्ध पडला । तेंव्हा देव धावला ॥ गणपतीने प्रत्यक्ष येऊन । बल्लाळाला दिले दर्शन । मस्तकी वरदहस्त ठेऊन । सहस्र आशीर्वाद दिले ॥ बल्लाळाचा जो ईश्वर । तोचि झाला बल्लाळेश्वर । त्याच नावे त्या जागेवर । विराजतो श्री विनायक ॥

४. महड वरदविनायक

ॐ गँ गणपतये नमः । आता तो चवथा गणपती । काय वर्णावी त्याची महती । कुलाबा जिल्ह्यात महड क्षेत्री । वरदविनायक वसत असे ॥ प्राचीन काळी मगध देशी । एकदा घटना घडली ऐसी । राजप्रासादी श्राद्धासी । जमले सर्व ऋषीमुनी ॥ आमंत्रीले होते राजाने । तपोनिधी बहू आदराने । त्यात गृत्समदाचा । अत्रीने अपमान केला ॥ अत्री म्हणे हे गृत्समदा । तुझा जन्म पवित्र न कदा । ऐकून ते खदा खदा । सभा सर्व हसली ॥ माते चे पापा चरण । ते तुझ्या जन्माचे कारण । म्हणुनी जगती हीन । तूला मानिती ॥ ऐकूनि अत्री चे ते वचन । गृत्समद झाला मनी खिन्न । सहन न होता अपमान । क्रोधे निघाला सत्वरी ॥ गृत्समद आला माते पाशी । मम जन्मकथा म्हणे सांग मशी । प्रश्न पडला त्या मातेसी । आता काय सांगावे ॥ परी तिने केले सत्य कथन । म्हणे पाप घडलें माझ्या कडून । आता मला मनापासून । पश्चाताप होत असे ॥ गृत्समद महामुनी । शाप वाणी वदला वाणी । म्हणे काटेरी बोर होऊनी । राहशील ह्या भूवरी ॥ सत्य झाली शाप वाणी । गृत्समद निघाला तेथूनी । आणि गेला घोर काननी । पापक्षालनाप्रित्यर्थ ॥ पुष्पक नाम शांत । एकांत दुर्गम स्थान । तिथे केले तपाचरण । शुष्कपर्ण भक्षूनी ॥ खडतर ते महातप । मुखी विनायकाचा जप । प्रगट झाला आपोआप । यथाकाळी गणपती ॥ म्हणे वत्सा तू धन्य धन्य । तुला झालो मी प्रसन्न । हवे असेल ते घे मागून । संदेह मनी नसावा ॥ गृत्समद म्हणे भगवान । पवित्र व्हावे हे वन । भक्तांच्या इच्छा करण्या पूर्ण । तूच येथे राहावे ॥ गणपती म्हणे तथास्तु । गणानां त्वाम् मंत्राचा कर्ता तू । हे निबिड अरण्य परंतु । पावन झाले तुझ्यामुळे ॥ कथा अशी ही पुण्यदायक । महडचा वरदविनायक । भक्तांचा असे प्रतिपालक । नमन भावे करावे ॥

५. थेऊर चिंतामणी गणेश

ॐ गँ गणपतये नमः । पाचवा गणेश आठातील । पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील । त्याची कथा आता पुढील । ओव्यात असे वर्णिली ॥ इंद्राने फसविले अहिल्येसी । तेंव्हा संतापले गौतमऋषी । शाप दिला पत्नीसी । आणि कामांध इंद्राला ॥ अहिल्या क्षणात शिळा झाली । इंद्राची कांती काळवंडली । सर्वांगाला भगे पडली । आणि सुटली दुर्गंधी ॥ नंतर सर्व देवांनी । गौतमाना केली विनवणी । त्यांची प्रार्थना ऐकुन । दिला त्यांनी उःशाप ॥ परस्री गमन पाप मोठे । इंद्राने केले कर्म खोटे । शांती तयाला आता कोठे । मिळणार नाही कधीही ॥ तथापि करता गणेश पूजन । तयाचे ध्यान आणि स्मरण । होईल पापाचे क्षालन । गणपती च्या कृपेने ॥ तिकडे इंद्र भोगिता पीडा । झाला होता गोप किडा । लोळे धरणी वरी गडबडा । हाय हाय म्हणोनी ॥ सर्व देव तिथे गेले । आणि ते इंद्राला म्हणाले । गौतमांनी शाप मुक्त केले । उःशाप तुला देऊनी ॥ गौतमांची उःशाप वाणी । त्याला सांगितली सर्वांनी । लागता गणेश भजनी । दुःख दूर होईल ॥ इंद्राची दशा पाहुन । कळवळले बृहस्पती मनी । त्यांनी इंद्राच्या कानी । गणेश मंत्र उपदेशीला ॥ इंद्राने मग काय केले । गणपती स्तवन आरंभीले । यथावकाश पूर्ण झाले । इंद्राचे मग मनोरथ ॥ गणपती तेथे प्रत्यक्ष आले । तेंव्हा भगांचे डोळे झाले । इंद्राचे रूप पालटले । सहस्राक्ष झाला तो ॥ चिंतिलेले देतो तो चिंतामणी । थेऊर क्षेत्री आहे अजूनि । संकटी तो येई धावुनि । मंगल करी भक्तांचे ॥ तयाचे चरणी ठेऊन माथा । गावी गणेशगौरव गाथा ।

६. लेण्याद्री गिरिजात्मक

ॐ गँ गणपतये नमः । या पुढे आहे गोड कथा । सहाव्या गणपतीची ॥ जिल्हा पुणे तालुका जुन्नर । तिथे केले डोंगरा वर । स्थान आहे मनोहर । लेण्याद्री नामे प्रसिद्ध ॥ त्याची आहे मोठी ख्याती । हिमालय कन्या पार्वती । एके काळी बैसली होती । तेथील एक गुहेत ॥ गणेश व्हावा पुत्र आपुला । असा तिने ध्यास घेतला । भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । मूर्ती एक घडविली ॥ मृत्तिकेची मूर्ती सानूली । दिव्य तेजे झळकू लागली । हा हा म्हणता समाधी लागली । तप उग्र महान ॥ पाहून ती असीम भक्ती । संतोषला महागणपती । माती ची मंगलमूर्ती । सजीव पहा जाहली ॥ म्हणे माते उघडी लोचन । जगन्माता तू महान । तुझे कराया समाधान । बालरूप झालो मी ॥ सत्य वाणी आता ऐक । देव भक्तांचा सेवक । तू जननी मी बालक । चरण तुझे वंदितो ॥ बालगणेशा पाहूनी । पार्वती झाली हर्षित मनी । आनंदाश्रू तिच्या लोचनी । तरळू तदा लागले ॥ पार्वती चे अंतःकरण । वात्सल्य प्रेमे आले भरून । दाही दिशांनी स्वर्गातून । पुष्पवृष्टी जाहली ॥ माता पार्वती महासती । पुत्र तिचा महागणपती । भक्तिभावे तया प्रति । सर्व देव वंदिती ॥ पुढे काही काळ गेला । बाल गणपती मोठा झाला । विघ्ने गेली लयाला । त्याच्या कृपाप्रसादे ॥ असुर क्रूर राक्षस गण । आले गणपती वरी चालून । परी त्यांचे निर्दालन । केले त्याने सर्वदा ॥ असती कोणी पापी दुष्ट । जाणुनी तयाचे कपट । केले तयांना नष्ट । महाशौर्य दाविले ॥ यम शेष आदी करून । गर्वाने गेले जे जे फुगून । करता तयांचे गर्व हरण । पदी लीन झाले ते ॥ गणपती च्या बाल लिला । लेण्याद्री येथे बहू झाल्या । म्हणून त्या भूमीला । पावित्र्य प्राप्त जाहले ॥ गिरिजेचा जो आत्मज । तयाचे नाव गिरिजात्मज । त्याच नावे त्या जागेवर । विराजतो श्री विनायक ॥

७. ओझर विघ्नहर

ॐ गँ गणपतये नमः । तालुका तोच जुन्नर । त्यातील गाव ओझर । तिथे आहे विनायक । तो सातवा ॥ पुण्यदायक त्याची कथा । भक्तिभावे ती पठण करता । किंवा श्रद्धेने परिसता । पुण्यलाभ होतसे ॥ एकदा इंद्राच्या दरबारी । नारदमुनीची आली स्वारी । कळ लावूनी । मौज स्वये पहातसे ॥ म्हणे त्या हिमालयावर । यज्ञ चालला आहे थोर । देवदेवता आणि इतर । जमले तेथे सर्वही ॥ राजा नामे अभिनंदन । सर्वा करी हविर्भाग अर्पण । तुझे मात्र त्याला स्मरण । होत नाही कधीही ॥ अरे केवढा अपमान । करितसे कसा तू सहन । छे छे नारायण नारायण । मी आपला जातसे ॥ ऐकून ते वर्तमान । इंद्र झाला क्रोधायमान । कराकरा दात ओठ चावून । हात पाय आपटी ॥ त्याने मग काय केले । सत्वर काळाशी बोलाविले । आणि त्याला सांगितले । यज्ञ नष्ट कराया ॥ असेल त्याचा नाश करणे । सौंदर्याचा शत्रु होणे । जिविताला मृत्यु देणे । हेच काम काळाचे ॥ म्हणून काळ आनंदला । आणि तो विघ्नासुर झाला । वायू वेगे धावत गेला । हिमालयाच्या दिशेने ॥ विघ्नासुर तो महागुंड । लाथेने फोडले होमकुंड । यज्ञ मंडप तो प्रचंड । क्षणांत केला उद्ववस्त ॥ जे जे असती सज्जन । तयाशी छळती दुर्जन । परी त्यांचे निर्दालन । देव स्वये करीतसे ॥ सत्कार्यात विघ्न आले । तेंव्हा सर्व देव भ्याले । हात जोडून प्रार्थु लागले । धाव पाव विनायका ॥ तेंव्हा काय चमत्कार झाला । पार्श्व आणि दिपवत्सला । ह्यांच्या पोटी जन्म घेतला । गणपतीने झडकरी ॥ पार्श्व पुत्र तो गणेशावतार । युद्धाला झाला तयार । देवांना घेऊन बरोबर । संग्रामासी निघाला ॥ काळपुरुष तो विघ्नासुर । रुप पालटी वारंवार । सर्व देव खरोखर । भय भीत झाले ॥ तेव्हा आपल्या अंकुशाने । प्रहार केला पार्श्वपुत्राने । एक क्षणात विघ्नसुराने । याचना केली दयेची ॥ पार्श्वपुत्र म्हणजे गजानन । हे काळाने जाणले पूर्ण । म्हणुन तयाचे चरण । वंदिले म्हणे क्षमस्व ॥ गौरीनंदना हे गणराया । मी तुझ्या पडतो पाया । मजवरी करावी दया । भक्तवत्सला विनायका ॥ भक्त तुझा मी आजपासून । तुझीच आज्ञा पाळीन म्हणून । माझे नाव धारण करून । उद्धार माझा करावा ॥ अभय देऊन विघ्नासुरासी । विघ्नेश नाम घेतले आपणासी । तेणे सकल देवांसी । संतोष जाहला ॥ भाद्रपद शुद्ध चतुर्थी । पुण्य वेळा मंगल तिथी । देवांनी ती मंगलमूर्ती । ओझर ग्रामी स्थापिली ॥ तेव्हा पासून तो विघ्नहर । विघ्ने दूर करी सान थोर । विद्या आणि बुद्धी अपार । सर्व भक्तांसी देतसे ॥

८. रांजणगाव महागणपती

ॐ गँ गणपतये नमः । रांजणगाव हे आठवे क्षेत्र । विनायकाचे स्थान पवित्र । आहे ते शिरूर तालुक्यात । कथा त्याची पवित्र ॥ एकदा त्या त्रिपुरासुराला । गजाननाने वर दिधला । तेणें तो मत्त झाला । आणि केली पुंडाई ॥ देवावरी केली स्वारी । देव मंडळी भ्याली सारी । सामर्थ्यांत त्याची बरोबरी । कोणीही करिना ॥ इंद्राच्या राजधानीत शिरला । आपण इंद्रपदी बैसला । अमरावती नगराला । राक्षसांनी व्यापले ॥ एवढा मोठा कैलास । गदागदा हालवून त्यांस । भोळा सांब महेश । पिटाळून लावला ॥ त्रिपुराचा दुसरा हस्तक । दुष्ट पापी आणि हिंसक । तयाने तर पाताळलोक । दुःखावर्णी लोटला ॥ शांतता सारी नष्ट झाली । जनता दारिद्रयाने गांजली । तिन्ही लोक भरली । पाप कर्मे अपार ॥ ऐसे असुर मातले । पावित्र्य पुण्य लया गेले । अनीती पाप वाढले । राक्षस राज्य जाहले ॥ देव गंधर्व मानव सकळ । झाले विकल । आणि दुर्बल । जीवन झाले असह्य ॥ महादेव तो शंकर । पुढें झाला तदनंतर । गणेशा प्रार्थूनि सादर । युद्धा सिद्ध जाहला ॥ त्रिपुराचे राक्षस सैन्य । आणि ते असंख्य शिवगण । यांचे महायुद्ध भयाण । सुरू झाले तेधवा ॥ नाना परीची नाना शस्त्रे । अनंत आयुधे आणि अस्त्रे । अग्निज्वाला पेटती पलिते । याविण दुजे न दिसे ॥ गडद धुरांच्या लोळांनी । सूर्यही गेला झाकळोंनी । रणभेरीच्या गर्जनांनी । दिशा दाही व्यापिल्या ॥ होता होता अखेरीस । त्रिपुरासुर आला जेरीस । राक्षस सैन्याचा नाश । पूर्णपणे जाहला ॥ ठार झाला त्रिपुरासुर । विजयी झालें श्रीशंकर । आनंदी आनंद ब्रह्मांडभर । साजरा झाला सर्वत्र ॥ रांजणगावी शंकराने । गणेश पूजीला शुद्ध मनाने । आणि त्याच्या कृपेने । त्रिपुरासुर मारिला ॥ म्हणोनि ते गणपती स्थान । जगती झाले पवित्र पावन । तो आठवा गजानन । नमिला मिलिंद माधवे ॥

फलश्रुतिः

ऐसे अष्टविनायक कैवारी । मस्तक ठेवीता चरणावरी । झडकरी कल्पवृक्षापरी । इच्छा पूर्ण करतील ॥ आठवितो त्या डोळे मिटूनी । दर्शन घेतो मनीच्या मनी । लोटांगणे सहस्र घालूनि । मागणें हेचि मागतो ॥ देवाधिदेवा दया करी । संकट निवारूनी सुखी करी । तव कृपेची मजवरी । छाया असो अखंड ॥ आप्त स्वकीय सुखी असो । चिंता क्लेष मुळी नसो । लक्ष्मी सरस्वती घरी वसो । शांती नांदो सर्वदा ॥ प्रसन्न व्हाव्या रिद्धीसिद्धी । प्राप्त व्हावी अपार बुद्धी । आयुष्य आरोग्य समृद्धी । लाभो देवा सर्वदा ॥ धन धान्यादी संपत्ती । भाग्यशाली गुणी संतति । या सर्वासह वाढो कीर्ती । जगतामाजी उदंड ॥ भूत पिशाच समंध बाधा । जादूटोणा अघोरी विद्या । या पासून रक्षावे सर्वदा । शत्रूनाश करावा ॥ द्वीपाद चतुष्पाद प्राणी । तसेच नोकर चाकर आणि । आश्रित असतील कोठे कोणी । सर्वा अभय असावे ॥ कफ वात पित्त दोष । अष्टव्याधी ज्वर सर्प विष । हे सर्व व्हावें निःशेष । गोड नामामृते तुझ्या ॥ सुखकर्ता तू दुःखहर्ता । विघ्नविनाशक विद्यादाता । भवसागरी ह्या तूंचि त्राता । नमन माझे साष्टांगी ॥ कोणी असो धनार्थी । कोणी असो विद्यार्थी । कोणी असो लग्नार्थी । किंवा पुत्रार्थी । वा असो कोणी ॥ करता भावे हा ग्रंथ पठण । श्री गजानन होइल प्रसन्न । मनीची इच्छा करील पूर्ण । सत्य सत्य वाचा ही ॥ ॐ श्री गजाननयाय नमः । इति श्री अष्टविनायक स्तोत्रं च माहात्म्य संपूर्णम् । ॥ श्री गजाननार्पणमस्तू ॥ ॥ शुभम् भवतु॥ ॐ गँ गणपतये नमः । Prepared by Mandar Puranik मंदार पुराणिक सहाय्य - शरयू जोशी, प्रमोद पुराणिक, निलेश आपेट
% Text title            : Ashtavinayaka Mahatmya Marathi
% File name             : aShTavinAyakamAhAtmyamarAThI.itx
% itxtitle              : aShTavinAyaka mAhAtmya (marAThI)
% engtitle              : aShTavinAyaka mAhAtmya (marAThI)
% Category              : ganesha, mAhAtmya
% Location              : doc_ganesha
% Sublocation           : ganesha
% Language              : Sanskrit, Marathi
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Transliterated by     : Mandar Puranik
% Proofread by          : Mandar Puranik, NNA
% Description/comments  : sahAyya - sharayU joshI, pramoda purANika, nilesha ApeTa
% Latest update         : August 27, 2025
% Send corrections to   : sanskrit at cheerful dot c om
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org