नमः शिवाय सर्वदा
नमः शिवाय सर्वदा
मंत्र आदरे वदा ।
चित्त शांत होतसे
बाधती न आपदा ॥ १॥
ब्रह्म पूर्ण निर्गुणी
भक्त भाव लक्षुनी ।
मूर्त सर्वमंगला
होत शंभु होउनी ॥ २॥
चंद्रकोर मस्तकी
नागबंध हस्तकी ।
कालकूट सेविले
निस्पृहे अलौकिकी ॥ ३॥
काम जाळिला स्वये
मृत्यु कापतो भये ।
मोहिनीस पाहुनी
थक्क होत विस्मये ॥ ४॥
थोर देव याहुनी
जगत्रयीं नसे कुणी ।
कृपाळ भक्तरक्षणा
येत शीघ्र धावुनी ॥ ५॥
भाव ज्यापरी असे
हा तसाच होतसे ।
सर्वशक्ति सर्वठायी
सर्वरूप हा वसे ॥ ६॥
वेध लावूनी मना
सोडुनी अहंपणा ।
शंकरास वंदिता
मोक्षहि ठरे उणा ॥ ७॥
म्हणोनि नाम घ्या मुदा
ही ``अनंत'' संपदा ।
चित्त लीन जाहल्या
उपेक्षितो न हा कदा ॥ ८॥
रचयिता - स्वामी वरदानन्दभारती
Encoded and proofread by Arun Parlikar