श्रीनरसिंह आरती मराठी
(१)
कडकडकडकडशब्दे स्तम्भहि कडकडला ।
नरहरी तव रव दुर्धर भयानकी उठला ।
थरथर कम्पित धरणी दिग्गजा पळ सुटला ।
तडतड अण्डकटाह मेरुहि डगमगला ॥ १॥
जयदेव जयदेव जय नरहरि विष्णो, श्री नरहरि विष्णो ।
निजभक्तां सुखकारी, असुरान्ते भयकारी प्रसीदप्रभ विष्णो ॥ धृ ॥
जनके प्रह्लादासी अति पीडा करितां ।
प्रकटसि भक्तकृपाळू स्तम्भिच अवचिता ।
स्थावर जंगम व्यापक समान जी समता ।
वेदप्रणीत दाविसि सत्यचि ब्रह्मतता ॥ २॥
जडतनुत्रयाद्यहं जड हिरण्यकशिपूला ।
सन्धिनखे विदारुनि दुर्घट मारियला ।
प्रसन्न सम्यग्ज्ञाने निज प्रह्लादाला ।
अमरचि करिसी मौनी वन्दित चरणाला ॥ ३॥
(२)
प्रेमानन्दे करितो आरती । तारी दीनाला ॥ १॥
आरती ही तुजला नरहरी । आरती ही ॥ ध्रु. ॥
प्रह्लादाते छळिता प्रगटसी । फोडुनी स्तम्भाला ॥ २॥
स्थावर जंगम व्यापक आहे । दाविसि हे रिपुला ॥ ३॥
कनककशिपू वधुनी सत्वरी । तारिसि दासाला ॥ ४॥
विठठलसुत बलवत्कवि विनवी । रक्षि विभो मजला ॥ ५।
हरिभक्त देखोनी दुःखदुर्जना ।
(३)
चाण्डाळ ते पापी देखो न शकती सज्जना ।
प्रह्लाद गांजिला केली यातना ।
पाहवेना साहवेना देवा राहवेना ॥ १॥
जयदेव जयदेव जय सिंहवदना ।
आरती ओवाळूं सेवक सुखशयना ॥ ध्रु. ॥
तटतटिला स्तम्भ कडकडिल्या ज्वाळा ।
तडतडिल्या पडल्या नक्षत्र माळा ।
घडघडिले पर्वत कल्पान्त वेळा ।
थोर हलकल्लोळ झाला विधी गोळा ॥ २॥
पिंगट जटा जिव्हा कडकडिल्या दाढा ।
धगधगले लोचन गडगडला गाढा ।
खणखणिती शस्त्रे वोढयावरि वोढा ।
पछाडिले रजनीचर केलासे रगडा ॥ ३॥
चरचरचर उदर फाडी विभाण्डी ।
तर आन्तर माळा वोढोनी काढी ।
थरथर पोटी आवेश क्रोध भडाडी ।
भक्त प्रह्लादा जवळी वोढी ॥ ४॥
देव भक्तांचा कैवारी साचा ।
गजागण्डस्थळी चपेट सिंहाचा ।
तो हा नरकेसरी न बोलवे वाचा ।
सौम्य झाला नरहरी स्वामी दासाचा ॥ ५॥
इति श्रीनरसिंहआरती (मराठी) ।
Proofread by Manoj Kumar Barman