संस्कृत सघन उच्चार पद्धति

संस्कृत सघन उच्चार पद्धति

आपलें मनीं वसत असलेला विचार, भाव - इतरांस समजावून सांगण्याचे सांकेतिक ``ध्वनि'' म्हणजे ``भाषा''. भाषा म्हणजे ध्वनिरूपशब्द व वर्णरूपशब्द यांचा असीम विस्तार होय. भाषेच्या विशुद्ध उच्चाराची एक ``घनता'' आहे. शुद्ध उच्चाराची घनता, ``यथार्थ-अर्थवाहक पदांची घनता'', उच्चार कर्त्याच्या सद्भावनेची, तपश्चर्येची घनता, उच्चारण कर्त्याच्या ``प्रातिभ-अनुभूतिगुण संपन्नतेची घनता'', अशी ``शब्दघनता'' अनेक प्रकारची आहे. संस्कृत वेद-शास्त्रादि अनेक ग्रंथांमध्ये ``ज्ञाना''ची फार मोठी सांठवण आहे. संस्कृतभाषा येत असेल त्यासच ते ज्ञान संपादन करणे शक्य व सुलभ आहे. लेखनांत ``घसेट लेखन'' अंशतः मान्य आहे; पण ``घसेट उच्चारण'' मान्य नाही. यद्यपि ``घसेट-उच्चारण'' हि आपले विचार - भावना इतरांस समजावून सांगण्याचे एक ``माध्यम'', प्रभावी साधन आहे. ``देवनागरी लिपी'' ही सर्व लिपींची मूळ - जनयित्रि आहे. ``संस्कृत'' भाषाहि एकानेक भाषांची मूळ असल्याचा आढळ होतो. तसेंच ईश्वरकृपा - श्रीगुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या हातून काही तरी ईश्वर - सेवेचे, देवाराधनेचे कार्य व्हावयास हवे. ईश्वरसेवेचे-आराधनेचेहि अनेक प्रकार आहेत. त्यांतच ईश्वराची स्तुति-स्तोत्रे भक्तिभावनेनें म्हणत राहणे, प्रासादिक ग्रंथांची पारायणे करणे, नामगीत गाणे याहि प्रकारांचा समावेश आहे. विशुद्ध पठण, विशुद्ध स्तोत्रगान, शुद्ध - पारायण हा त्याचा ``पाथेय'' आहे, पायथा आहे, ही अगदी पहिली-वहिली पायरी आहे. त्यानंतर अर्थ परिचय, समन्वयाने अर्थपरिचय, आणि ईश्वराच्या साक्षात्कारात्मकज्ञानानें अर्थरूपता संपादन करणे या पायऱ्या आहेत, हे खास. ``संस्कृत'' स्तुति-स्तोत्रे विशुद्धरूपानें म्हणता येण्यासाठी, संस्कृतांतील विशुद्ध-उच्चारपद्धतीची अचूक जाण आपणास असणे अत्यंत आवश्यक आहे. हे ``उच्चार'' त्याच्या जाणकारांपासून समजून घ्यावेत. तसेच संस्कृतचे पंडित, संस्कृत जाणणारे, प्रवचन-कीर्तनांमध्ये कसे उच्चार करतात, त्याकडे नीट लक्ष द्यावे. आपणहि ते तसे उच्चारकरून, त्यांकडून ``संथा'' घेऊन आपले उच्चार अचूक, बरोबर असल्याचे त्यांचेद्वारां खात्री करून घ्यावी. तसेंच ``यज्'' धातूचे संगतिकरण, दान आणि पूजा, असे तीन अर्थ आहेत. त्यांपैकीं ``संगतिकरण'' या अर्थाचेहि पुनः प्रधान असे तीन अर्थ आहेत. त्यांत पहिला अर्थ असा १. वेदाची संथा अथवा संस्कृत स्मृतिग्रंथाची संथा घेत असतांना श्रीगुरूंच्या मुखांतून ज्या क्रमाने स्वरादि विशिष्टरूपाने निघालेल्या शब्दांशी शिष्याने सुसंवादीपणानें अस्सलवरहुकूम ऐक्य करणे, तसाच ``उच्चार करणे'' यासच ``संगतिकरणरूप ``वाग्यज्ञ'' म्हणतात. २. वेद-शास्त्राचा पाठ अथवा अध्यात्मविद्येचा पाठ उपदेशरूपाने देत असतांना श्रीगुरूंच्या मुखांतून निघालेल्या शब्दांशी, त्यांना अभिप्रेत असलेल्या अभिप्रायाशी, तात्पर्याशी - शिष्याने आपल्या शब्दानें, अभिप्रायाचे, आशयाचे ``अनुवादपणाने'', संगतिकरण - म्हणजे-पुरते ऐक्य करणे, यालाहि ``वाग्यज्ञ'' म्हणतात. ३. श्रीगुरुकृपेनें लाभलेले समाधिधन, ब्रह्मात्मैक्य बोधधन शिष्याच्या हृदयरूप संदुकेंत संक्रमित करून दिले असता त्या सद्बोधानंदाच्या तुल्य स्वरूप अशा संगतिकरणानें, ऐक्यानें, ब्रह्मत्वाने असणे, हाच ``वाग्यज्ञ'' होय. हा सर्वहि अभिप्राय मनी घेऊन श्रीज्ञानदेव महाराज चवथ्या अध्यायांत सांगतात - एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो ``वाग्यज्ञ'' म्हणिजे । ।४-१४२ । । असा ``वाग्यज्ञ'' संपन्न होण्यासाठी उच्चारपद्धतीची शुद्धता वा घनता प्राथमिक स्वरूपांत ज्ञात असणे जरूरीचे आहे, हे जाणून केवळ मार्गदर्शनाकरितां शुद्ध उच्चाराचे काही नियम आम्ही येथे दिले आहेत. ते समजून घेऊन त्याप्रमाणे आणि जाणकारांच्या द्वारा संथा घेऊन त्याप्रमाणे तसा उच्चार करण्याचा प्रयत्न करावा. तसे पाहिले तर मराठीत संस्कृत, तत्सम आणि संस्कृतोद्भव शब्दांचा विपुल प्रमाणांत उपयोग केला जातो. म्हणून संस्कृत उच्चार शुद्ध स्वरूपांत करणे आपल्याला फारसे ``अवघड'' नाही. प्रस्तुत लेखांत संस्कृत शब्दांची रूपें, वाक्ये आपण निर्माण करण्याविषयी काही लिहिणार नाही. तर संस्कृतांत लिहिलेली वाक्ये, स्तोत्रं फक्त शुद्ध वाचावयाची- उच्चार करावयाची आहेत. प्रत्येक मराठी साक्षरास तेवढे लिपि ज्ञान असतेच. तरीहि उच्चारास आवश्यक तेवढा ``वर्णमाले''चा व शुद्ध, सुस्पष्टौच्चार करण्यास अर्थात् शब्दांतील वर्ण, -हस्व, दीर्घस्वर, बरोबर, तसेंच जोडाक्षरे वा सामासिकपदें यांचा स्पष्टपणानें समजतील अशा प्रकाराने-पद्धतीने शब्दांचे उच्चार करण्यास उपयुक्त असणाऱ्या नियमांचा विचार करणे, हे एवढेच मर्यादित आपले ``ध्येय'' आहे.

देवनागरी लिपी, वर्णमाला आणि तिची वैशिष्टये

वर्णमाला - स्वर १३ ``स्वयं राजते इति स्वरः'' स्वतः अंगानेच शोभतो, विराजमान होतो तो ``स्वर'' होय. जसें ``व्यंजनास'' विराजमान होण्यासाठी ``स्वराची'' आवश्यकता असते, तशी स्वरास नसते, असा यांतील आशय आहे. ऱ्हस्व - अ इ उ ऋ ऌ दीर्घ - आ ई ऊ ॠ संयुक्तस्वर - ए, ऐ, ओ, औ याशिवाय कोणत्या वर्णाचे, कोणते स्थान आहे, हे जाणण्यासाठी व पाठांतरासाठी सुलभ उपाय म्हणून पुढील वाक्यांचे संकलन देत आहोत - व्यंजने - ३३ वर्ग - - कठोर - अघोष - मृदु - घोष - अनुनासिक ``क'' वर्ग - कण्ठ्य - क् ख् - ग् घ् - ङ् ``च'' वर्ग - तालव्य - च् छ् - ज् झ् - ञ् ``ट'' वर्ग - मूर्धन्य - ट् ठ् - ड् ढ् - ण् ``ट'' वर्ग - दन्त्य - त् थ् - द् ध् - न् ``प'' वर्ग - ओष्ठ्य - प् फ् - ब् भ् - म् अंतस्थ - - य् र् ल् व् ऊष्म - - श् ष् स् महाप्राण - ह् संयुक्त व्यंजनें- क्ष, ज्ञ, ळ ‍ं अनुस्वार; ः विसर्ग १. अकुह विसर्जनीयानां कण्ठः - ``अ''कार, ``क''वर्ग, ``ह''कार आणि विसर्ग, या अक्षरांचे स्थान कंठ आहे. अर्थात् - - - ``''अ, क, ख, ग, घ, ङ, विसर्ग'' २. इचुयशाना तालु - इ, ``च'' वर्ग, ``य'' आणि ``श'' यांचे स्थान तालु आहे. ३. ऋटुरषाणां मूर्धा - ऋ, ``ट'' वर्ग ``र'', ``ष'' यांचे स्थान मूर्धा आहे. ४. लृतुलसानां दन्ता - लृ, ``त'' वर्ग ल, स यांचे स्थान दन्त आहे. ५. उपूपध्यानीयालामोष्ठौ - उ, ``प'' वर्ग, उपध्मानीय यांचे स्थान ओष्ठ आहे. (विसर्गापुढे ``प'', ``फ'' ही व्यंजनें - - आली. असतांना विसर्गाचा उच्चार ``अःप'' असा होतो यास ``उपध्मानीय'' असे - - म्हणतात. ६. ञमङणनानां नासिकाच - य, म, ङ, ण, न, या वर्णांचे नासिका आणि त्या त्या वर्णाचे स्थान. उदा. ``ञ'' - - चे स्थान तालु व नासिका आहे. ७. एदेतोः कण्ठतालुः - ``ए''कार आणि ``औ''कार यांचे कण्ठ तालुस्थान आहे. ८. ओदौतोः काण्ठोष्ठम्ः - ``ओ''कार आणि ``औ''कार यांचे स्थान कंठोष्ठ आहे. ९. ``व'' कारस्य दंतोष्ठम्ः- ``व'' वर्णाचे स्थान ``दंत्य'' आणि ओष्ठ आहे. १०. जिह्वामूलीयस्य जिह्वामूलमः- जिह्वामूलीयाचे जिह्वामूल स्थान आहे. विसर्गाच्या पुढे ``क, ख'' आले - - - असतांना जो उच्चार होतो त्याला ``जिह्वामूलीय'' म्हणतात. ११. नासिकानुस्वारस्यः- नासिका हे अनुस्वाराचे स्थान आहे. - स्वरांमध्ये ``अ, इ, उ, ऋ, लृ'' हे पांच ``ऱ्हस्व'' स्वर आहेत. ऱ्हस्व स्वराची ``एक मात्रा'' असते आणि दीर्घस्वराच्या ``दोन मात्रा'' असतात. हेच वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर ते असे - - अ + अ = आ - - इ + इ = ई - - उ + उ = ऊ - - ऋ + ऋ = ॠ - ``आ, ई, ऊ, ॠ'' हे चार दीर्घ- स्वर आहेत. ``लृ'' स्वर हा फक्त ऱ्हस्व आहे, दीर्घ नाही. हे आवर्जून लक्षी ठेवावे. - आतां ``अकः सवर्णे दीर्घः'' या सूत्रानुसार ``सवर्ण'' म्हणजे एकाच जातीचे, सजातीय दोन ``स्वर'' एका जवळ एक, एका पुढे एक आले असता ते एकमेकांत मिळून ``दीर्घस्वर'' होतो. याला ``सवर्ण दीर्घ संधि'' म्हणतात. तसेच वेगवेगळ्या जातीचे - विजातीय ``स्वर'' जवळ - जवळ आले असतां ``संयुक्त स्वर'' होतात, जसे - ``अ'' किंवा ``आ'' + ``इ'' किंवा ``ई'' = ए - ``अ''किंवा ``आ'' + ``उ'' किंवा ``ऊ = ओ - ``अ'' किंवा ``आ'' + ``ए'' किंवा ``ऐ = ऐ - ``अ'' किंवा ``आ'' + ``ओ'' किंवा ``औ'' = औ. संयुक्त स्वरांत एकापेक्षा अधिक स्वर आहेत, म्हणून ते ``दीर्घ'' असतात, हे उच्चार करते वेळी नीट ध्यानात ठेवावे. तसेंच व्यंजनामध्ये संस्कृतांतील वर्णमालेमध्ये ``ळ'' हे स्वतंत्र व्यंजन नाही, हेहि ध्यानात ठेवावे. पण ``ळ'' हे संस्कृत वाङ्मयांत ``संध्यक्षर'' म्हणून येते. ऋग्वेदाच्या प्रारंभीच ``अग्निमीळे पुरोहितन्'' या वचनांत ``ळ'' हे अक्षर आले आहे. याविषयी असा नियम आहे की, ``अज्मध्यस्थस्यडकारस्य ``ळ''कारः बह्वृचना जगुः ।'' दोन स्वरांमध्ये ``ड'' हे व्यंजन आले असता त्याचा ``ळ'' होत असतो. ``ईळे'' या रूपांत ``ई + ड् + ए'' अशी स्थिती असल्यामुळे ``ड'' चा ``ळ'' झाला आहे. म्हणून हे एक ``संध्यक्षर'' आहे. तसेंच- ``क + ष् = क्ष्'' अर्थात् ``कष योगे क्षः'' आणि ``ज् + ञ् = ज्ञ'' अर्थात् ``जञोर्ज्ञः'' म्हणजे क् + ष = यांच्यापासून ``क्ष'' हे संयुक्त व्यंजन होते, तर ज + ञ यांच्या संबंधामुळे ``ज्ञ'' हे संयुक्त व्यंजन होते, ही स्वतंत्र ``वर्ण'' नव्हेत तीं ``संध्यक्षर'', संयुक्त व्यंजने आहेत. वर्णमालेत व्यंजनें कशी लिहिली आहेत ते बारकाव्याने लक्षात ठेवावे अर्थात् केवळ ``व्यंजन'' हे ``क्, ख्'' असे पायमोडून लिहितात. आपण ``क'' असे अक्षर लिहितो ते ``क्'' व्यंजन + ``अ'' स्वर मिळून = ``क'' अक्षर झालेले असते. यास ``पूर्णाक्षर सन्धि'' असेहि म्हणतात. ह्याच प्रमाणे व्यंजन + स्वर = अक्षर या सूत्रानुसार - क् + आ = का; - क + इ = कि; - क् + ई = की; क् + उ = कु; - क् + ऊ = कू; - क् + ऋ = कृ; क + ऋ = क्र; - क् + ल = क्लृ; - क् + ए = के; क् + ऐ = कै - क् + ओ = को; - क् + औ = कौ - क् + अ + - = कम् - क् + अ + ः = कः - अशी बाराक्षरी- बाराखडी बनते. एकट्या ``व्यंजनाचा'' पूर्ण उच्चार करता येत नाही; त्यासाठी व्यंजनात ``स्वर'' मिळतो तेव्हां त्याचा पूर्ण उच्चार होतो. स्वरयुक्त व्यंजन म्हणजे ``अक्षर'', नुसत्या एकुलत्या एका कोणत्याहि स्वराचा पूर्ण उच्चार होतो. म्हणून ``स्वर'' हे स्वयंपूर्ण अक्षर आहे; पण ``व्यंजन'' हे केवळ, स्वयंपूर्ण अक्षर नसते; हेच खरे. रूपें शिकवतेवेळी ``राम'' हा ``अकारान्त शब्द आहे आणि ``हरि'' हा मात्र ``इ''कारान्त शब्द आहे, असे म्हणतात. म्हणजे ``राम'' शब्दाच्या अंती ``अ'' आहे व ``हरि'' शब्दाच्या अंती ``इ'' आहे. त्याचा अर्थ आपल्याला कळावा म्हणून पुढील प्रमाणे लिहितो ``राम = म्हणजे = र् + आ; - म् + अ'' यांत शेवटी, अंती. ``अ'' स्वर आहे म्हणून ``राम'' हा ``अ'' कारान्त शब्द आहे तर-- ``हरि = ह् + अ; र् + इ यांत अंती, शेवटी ``इ'' स्वर आहे. म्हणून ``हरि'' हा ``इकारान्त शब्द आहे. अशा प्रकारे ज्या शब्दाच्या शेवटी ``स्वर'' येते ते ``स्वरांत'' शब्द होत आणि ज्या शब्दाच्या अंती, शेवटी ``व्यंजन'' येते, ते ``व्यंजनात'' शब्द होत. उदाहरणार्थ मरुत्, राजन्, मनस् इत्यादि. - व्यंजना नंतर आलेला ``स्वर'' त्यांत मिळून ते ``अक्षर'' होते. त्याचप्रमाणे दोन अथवा अधिक व्यंजने आणि त्या नंतरचा ``स्वर'' मिळून ``जोडाक्षर'' तयार होते. जोडाक्षरांत किती व्यंजने असावीत याविषयी नियत असा नियम नाही. उदाहरणार्थ ``कार्त्स्न्य'' यांतील ``र्त्स्न्य'' मध्ये ``र् + त् + स् + न् + य् + अ अशी एकूण पांच व्यंजने आहेत. ‍ं अनुस्वार आणि ः विसर्ग ही चिन्हे आपल्याला ठाउकी आहेतच. अनुस्वारा सारखे हे एक चिन्ह आहे. त्याला ``अनुनासिक'' म्हणतात. त्याचा उच्चार मात्र ``अधिक भार'' देऊन केलेल्या अनुस्वारासारखाच होतो. उदाहरणार्थ- अस्माँस्तारयिष्यति । श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् । हत्त्वापि स इमाँल्लोकान् । इत्यादि. ``ऽ'' या चिन्हाला ``अवग्रह'' म्हणतात. (``एडः पदान्तादति'' । ।६- १ - १०९ या सूत्रानुसार।) शब्दाच्या शेवटी असलेल्या ``ए'' किंवा ``ओ'' नंतर यांच्यापुढे ``अ'' आला तर त्या ``अ'' चा लोप होतो आणि त्याच्या जागी ``अवग्रह'' चिन्ह येते. उदाः- इमे - अवस्थिताः = इमेऽवस्थिताः; लोके - अस्मिन् = लोकेऽस्मिन; प्रथमो + अध्यायः = प्रथमोऽध्यायः संस्कृतभाषेत भिन्न भिन्न शब्दांतील असले तरी जवळ जवळ आलेल्या व्यंजनांचा, ``व्यंजन'' आणि ``स्वर'' यांचा, आणि स्वरांचा ``सन्धि'' हा अवश्य होतोच. उदाहरणार्थ तत् - तत् = तत्तत्; वक्तुम् - अर्हसि = वक्तुमर्हसि, न-अस्ति = नास्ति; याला कांहीं ``अपवाद'' आहेत; ते असे. तसेंच संस्कृतांत `` ।'' असा एक अथवा `` । ।'' असे दोन दंड ही दोनच प्रधान विराम चिन्हें आहेत; पण स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह वगैरेंचाहि उपयोग करण्याची पद्धति बहुत थोड्या प्रमाणांत वा थोड्या बहुत प्रमाणात पडली आहे, हे सत्यहि नाकारता येत नाही. अर्थात् लैखिक पद्धतींत ती विराम चिन्हे आहेत ती अविरुद्ध आहेत. १. हस्वस्वराची एकमात्रा आणि दीर्घस्वराच्या दोन मात्रा असतात, हे आपणास पूर्वी सांगितले आहेच. म्हणून ``ऱ्हस्व-स्वर'' उच्चारण्यास जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षां ``दीर्घ स्वर'' उच्चारण्यास ``अधिक वेळ लागतो आणि त्यामुळेच ``ऱ्हस्व स्वर'' आणि ``दीर्घ - स्वर'' यांतील फरक स्पष्ट होईल असेच उच्चारण करावयास हवे. नाहीतर अर्थ भेदहि होतो. जसे ``दिन'' म्हणजे ``दिवस''. यांतील ``दि'' हे अक्षर उच्चारण करण्यास जेवढा वेळ लागतो; त्यापेक्षां ``दीन'' म्हणजे ``गरीब'' यांतील ``दी'' दीर्घ असून त्याचे उच्चारण करण्यास ``अधिक'' वेळ लागतो, असेंच सर्वत्र ``ऱ्हस्व'' आणि ``दीर्घ'' यांतील फरक केवळ उच्चारावरून स्पष्ट होईल, असाच उच्चार झाला पाहिजे. तसेंच ``ऱ्हस्व'' किंवा ``दीर्घ ``अ, इ, ड, ऋ'' च्यापढे सवर्ण म्हणजे तोच स्वर आला तर त्या दोन्हींचा मिळून ``दीर्घ स्वर'' होतो. उदाहरणार्थ- १ तस्य - अहम् = तस्याहम; २ यथा-आकाशस्थितः = यथाकाशस्थितः; ३ इंद्रियाणि - इन्द्रियार्थेभ्यः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः; ४ अङ्गानि - इव = अङ्गानीव, तेषु - उपजायतेः तेषूपजायते; ६तु- उद्देशतः = तूद्देशतः, ७ गीतासु-उपनिषत्सु = गीतासूपनिषत्सु, न - अनुवर्तयति - इह = नानुवर्तयतीह ``अकः सवर्णे दीर्घः ६-१-१०१. २. ``ऋ'' या स्वराचा उच्चार ``रि'' आणि ``रु या दोन अक्षरांच्या मधल्या उच्चारासारखा करावा; ``लृ'' चा उच्चारहि ``लि'' आणि ``लु'' यांच्या मधल्या उच्चारासारखा करावा. तो प्रत्यक्ष श्रीगुरूमुखानेंच समजून प्रत्यक्ष - तेत आणावा. ३. वर्णमालेतील ``च'' वर्गाची व्यंजने मराठीभाषेत दोन त-हेनें उच्चारली जातात; एक म्हणजे ``चक्र, छाया, जन्म, झंकार'' या शब्दांतील उच्चाराप्रमाणे, आणि दुसरा म्हणजे ``चमचा, जहाज, झगडा'' या शब्दांतील उच्चाराप्रमाणे, उच्चारली जातात; पण संस्कृतभाषेमध्ये उपर्युक्त-वरील उच्चारांपैकी दुसऱ्या प्रकारचा उच्चार नाही, तर सर्वत्र पहिल्या प्रकारचा म्हणजे ``चक्र, छाया, जन्म, झंकार'' यांतील उच्चारासारखाच उच्चार करावा. ४. अनुस्वारानंतर म्हणजे ``ज्या अक्षरावर अनुस्वार आहे, त्या अक्षरानंतर'' ज्या ``वर्गा''चे वा वर्गातील व्यंजन असेल त्या वर्गातील ``अनुनासिका''सारखा त्या ``अनुस्वाराचा उच्चार करावा. अनुस्वारापुढील अक्षर ज्या वर्गातील असेल त्या वर्गाचे अनुनासिक होत असते असा ``अनुस्वारस्य ययि परसवर्णः ८-४-५८ या सूत्रानुसार सन्धि होतो. इतकेच नव्हे तर लिहितांना सुद्धा त्या अनुस्वाराऐवजी त्याच्या पुढील व्यंजनाच्या वर्गाचे अनुनासिक लिहावे. उदाहरणार्थ- १ अङ्ग, २ व्यञ्जन, ३ कण्ठ्य, ३ दन्त्य, ५ अम्बा. ५. ``पंचमी'' शब्दाचा उच्चार काही लोक ``पन्चमी'' असा करतात; तो चुकीचा आहे. त्याचा ``पञ्चमी'' असाच उच्चार करावा. ६. आतां अनुस्वारानंतर ``क, च, ट, त, प'' या वर्गाखेरीज ``य, र, ल, व, श, ष, स, ह'' यांपैकी कोणतेहि व्यंजन आले तर अनुस्वार कायम तसाच राहतो; पण त्यांचा उच्चार मात्र पुढे आलेल्या व्यंजनानुगुण म्हणजे पुढील व्यंजनास जुळणारा सानुनासिक करतात. त्याची उदाहरणे म्हणजे ``संयम, संरक्षण, संलग्न, संशय, संसार, संहार'' ही प्रसिद्ध स्वरूपें होत. ७. संस्कृतमध्ये जोडाक्षरापूर्वी आलेल्या अक्षरांवर जोडाक्षरानुगुण म्हणजे पुढील व्यंजनास जुळणारा असा ``भार'' किंवा ``आघात'' येतो, तो जाणीवपूर्वक करावा. उदाहरणार्थ ``धर्मक्षेत्रे यांत ``र्म, क्षे आणि त्रे ही जोडाक्षरें आहेत. म्हणून ध, म, आणि ``क्षे'', या अक्षरांवर भार - आघात येतो. मराठी भाषेत ``पुण्याला, जाड्या, रड्या, उद्या'' अशाप्रकारच्या जोडाक्षरांच्या पूर्वीच्या अक्षरावर ``भार - आघात'' नसतो; पण संस्कृतमध्ये असे नाहीं; जो जोडाक्षराच्या पूर्वीच्या अक्षरावर ``भार - आघात'' हा निरपवाद येतोच; हा अनुपरोध नियम आहे. ८. विसर्गाचा उच्चार मात्र ``नीऽऽट'' समजाऊन घ्यावा, तोहि चांगल्या जाणकारांकडून समजाऊन घ्यावा. श्वासाचे जोराने शरीराच्या बाहेर मुखावाटे विसर्जन केल्याने होणारा ``उच्चार'' म्हणजेच ``विसर्ग'' होय. म्हणून विसर्गाचा उच्चार, हा विसर्गाच्या पूर्वी असणाऱ्या स्वराशी मिळत्या जुळत्या ``ह'' सारखा करावा; अर्थात् १. ``देवः'' चा उच्चार ``देवहा सारखा करावा. २. ``देवाः चा उच्चार ``देवाहा'' सारखा करावा. ३. ``हरिः'' चा उच्चार ``हरिहि'' सारखा करावा. ४. ``गुरुः'' चा उच्चार ``गुरुहु'' सारखा करावा. ५. ``देवैः'' चा उच्चार ``देवैहि'' सारखा करावा. ६. ``देवयोः चा उच्चार ``देवयोहो'' सारखा करावा. वर सांगितल्या प्रमाणे (ः) विसर्गाचे उच्चार करावेत, तेच विशुद्ध होत. ९. आतां विसर्गानंतर ``क, ख, किंवा प, फ ही व्यंजनें आली तर मात्र या विसर्गाचा उच्चार मागील स्वराशी मिळता-जुळता न करतां पुढील व्यंजनास मिळता-जुळता व कांहींसा अधिक ``भारपूर्वक - आघातपूर्वक करावा, तो मार्गदर्शकाकडून संथा घेऊनच नीट समजाऊन घ्यावा; उदाहरणार्थ-- ``कः खनति, कः पश्यति, अधियज्ञः कथं कोऽत्र । यः पश्यति । शब्दः खे १०. (``वा शरि'' ८-३-३६ या सूत्रानुसार) तसेच विसर्गानंतर ``श, ष किंवा स्'' आल्यास विसर्गाचा उच्चार मात्र अनुक्रमें ``श, ष किंवा स्'' असा करावा वा लिहावा उदाहरणार्थ- ``हरिःशेते'' अथवा ``हरिश्शेते असे लिहितात, वा उच्चार करतात. ``देवः षडाननः'' अथवा ``देवष्षडाननः'' ``यः सदा'' अथवा ``यस्सदा'' यारीतीनें कोणत्याहि रीतीने लिहिले तरी उच्चार मात्र सारखाच होतो, त्यांत मुळीहि फरक होत नाही. म्हणून तसा उच्चार करावा. ११. ``श्, ष्, स्'' यात सूक्ष्म फरक आहे, म्हणून दक्षतापूर्वक नीट आणि स्पष्ट उच्चार करावेत, हा फरक फारांच्या लक्षों येत नसल्याचा आढळ होतो. म्हणून साधकानें हा नियम कटाक्षाने पाळावा. अर्थात आपण ``शहामृग'' या शब्दाच्या उच्चारामध्ये ज्याप्रमाणे ``जीभे'' ने टाळूला किंचित स्पर्श करून ``श्'' चा उच्चार सहजतेने करतो, तसाच सर्वत्र उच्चार करावा, ``षट्कोण'' या शब्दाच्या उच्चाराचे वेळी जीभेनें टाळूच्या वरच्या भागाला म्हणजे मूर्धाला स्पर्श करतो, त्याप्रमाणेच सर्वत्र ``प्'' चा उच्चार करावा ``समई'' या शब्दाचे उच्चाराचे वेळी जसा दातांना किंचित् जिभेचा स्पर्श करून उच्चार करतो, तसाच सर्वत्र ``स्'' चा उच्चार करावा. १२. जोडाक्षरांमध्ये ज्या क्रमाने व्यंजनें मूळांत जोडली गेलेली असतात, त्याच क्रमानें बहुत करून, प्रायः लिहितात. आपण उच्चार करतांनाहि प्रायः अगदी त्याच क्रमाने उच्चार करावेत. उदाहरणार्थ वस्तु- यांत ``स्''चा उच्चार पहिल्यांदा आहे; नंतर ``तु''चा आहे. वत्स- यांत ``त्''चा उच्चार पहिल्यांदा आहे; नंतर ``स''चा उच्चार आहे. शुक्ल - यात ``क्''चा उच्चार पहिल्यांदा आहे; नंतर ``ल''चा उच्चार आहे. शुल्क- यांत ``ल्'' चा उच्चार प्रथम आहे; नंतर ``क'' चा उच्चार आहे. १३. कांही जोडाक्षरांमध्ये ``वर्णचिन्ह'' ``वर्णचिह्न'' खाली किंवा वर जोडतात. उदाहरणार्थ - महाराष्ट्र, प्रकाश, कार्य इत्यादि. १४. ``ब्राह्मण'' ``ब्रह्म'' मधील ``ह्म'' ह्या सारख्या जोडाक्षरांत ``ह्'' हा प्रथम असतो व संस्कृतांत लिहिताना अशा जोडाक्षरांतील ``ह्'' पहिल्यादां लिहितात उदाहरणार्थ ``ब्राह्मण, चिह्न, जिह्वा,'' या जोडाक्षरांचे उच्चार ``ब्राह्‍मण, चिह्‍न, जिह्‍वा'' असे ``ह्''चा पहिल्यांदा उच्चार करून करावेत. १५. तसेंच ``तर्हि, कर्हि, अर्हता'' या किंवा यासम शब्दांमध्ये ``र्'' प्रथम आहे आणि ``ह्'' नंतर आहे; म्हणून त्याचा उच्चार त्याच क्रमाने व तसाच म्हणजे ``तर्हि'' असाच करावा. श्रीमद्भगवत् गीतेतील काही ``सन्धी''च्या उदाहरणांवरून कांहीं संधि नियम समजाऊन घेऊ १. ``आद्गुणः'' ६-१-८७ या सूत्रानुसार ``अ'' किंवा ``आ'' च्या पुढे ``ऱ्हस्व'' किवा ``दीर्घ'' ``इ, उ, ऋ, लृ'' आले, तर दोन्हींच्या स्थानी क्रमाने ``ए, ओ, अर्, अल् येतात १. न इङ्ते = नेङ्ते;. २. दृष्ट्वा - इदम = दृष्ट्वेदम्; यथा - उल्वेन = यथोल्वेन; ४ आतिष्ठ - उत्तिष्ठ = आतिष्ठोत्तिष्ठ; ५ सा- उपमा = सोपमा. २. ``वृद्धिरेचि'' ६-१-८८ या सूत्रानुसार ``अ'' किंवा ``आ'' च्या पुढे ``ए'' किंवा ऐ आला तर ह्यादोहींचा मिळून ``ऐ'' होतो. ``ओ'' किंवा ``औ'' आला तर ``औ'' होतो. उदा. १ आत्मा एव = आत्मैव २. च औषधी = चौषधीः ३. ``इकोयणचि'' ६-१-७७ या सूत्रानुसार ``ऱ्हस्व'' किंवा ``दीर्घ'' ``इ, उ, ऋ, लृ'' यांच्यापुढे त्यांच्या खेरीजचा असा इतर दुसरा कोणताहि ``स्वर'' आला तर त्यांच्या स्थानी अनुक्रमें य्, व्, र्, ल् येतात. उदाहरणार्थ १ भजामि अहम् = भजाम्यहम्; २ तानि अहम् = तान्यहम्; ३ दुःखेषु - अनुद्विग्न - मनाः = दुःखेष्वनुद्विग्नमनाः ४. अस्तु इष्टकामधुक् = आस्त्विष्टकामधुक्. ४. ``एचोऽयवायावः'' ६-१-७८ या सूत्रानुसार य् व् चा लोक सांगणारे सूत्र ``लोप = शाकल्यस्य'' ८-३- १९ लोप झाल्यावर राहिलेल्या स्वरांचा संधि होत नाही. कारण ``पूर्वत्रासिद्धी'' ८-२-१ लोप झाला तरी तो प्रसिद्ध आहे. म्हणजे तेथे य, व, आहेत असेच समजावयाचे असते म्हणून संधि होत नसते. ए, ऐ, ओ, औ, यांच्यापुढे कोणताहि ``स्वर'' आला तर त्यांच्या स्थानी अनुक्रमें ``अय्, आय्, अव्, आव् येतात. या ``अय्, आय्, अव्, आव्'' यांच्या मधील ``य्'' अथवा ``व्'' चा विकल्पाने लोप होतो. लोप झाल्यावर मग उर्वरित राहिलेल्या स्वरांचा मात्र सन्धि होत नाही. उदाहरणार्थ :- १. रथोपस्थे - उपाविशत् = रथोपस्थ, युपाविशत् किंवा रथोपस्थ उपाविशत; २. वर्तन्ते + इति = वर्तन्तयिति किंवा वर्तन्त इति; ३. ब्रह्माग्नौ + अपरे - ब्रह्माग्नावपरे किंवा ब्रह्माग्ना अपरे, ४. समाधौ + अचला = समाधावचला किंवा समाधा अचला; ५. योत्स्ये + इति = योस्ययिति. किंवा योत्स्य इति; ६. ते इमे - तयिमे किंवा त इमे; ७. मोदिष्ये इति - मोदिष्य इति इत्यादि. ५. ``ङ मो -ऱ्हस्वादचिङ्मुण नित्यम्'' ८-३-३२ यासूत्रानुसार पदान्ती ``ङ्, - ण्, न्'' ही येऊन यांच्यामागे ``ऱ्हस्व - स्वर'' असून पुढे ``स्वर'' आला तर ``ङ्, ण्, न्'' यांचे द्वित्त्व होते. उदाहरणार्थ :- प्रहसन् - इव = प्रहसन्निव; अनिच्छन्- अपि = अलिच्छन्नपि. ६. ``खरिच'' ८-४-५५ झलांजश झशि. ८ -४-५३ या सूत्रानुसार अन्तःस्थ वर्ण सोडून कोणत्याहि व्यंजनापुढे ``कठोर व्यंजन'' आले तर मागील व्यंजना बद्दल त्याच्याच वर्गातील पहिले व्यंजन येते. आणि ``मृदु व्यंजन'' किंवा ``स्वर'' आला तर त्याच्यावर्गातील तिसरे व्यंजन होते. उदाहरणार्थ १. संमोहात् - स्मृतिविभ्रमः = संमोहात्स्मृतिविभ्रमः; २ क्रोधात् भवति । क्रोधाद्भवति; ३. सम्यक् - उभयोः = सम्यगुभयोः ७. ``झलांजशोन्ते ८-२-३९ या सूत्रानुसार पदांत व्यंजनापुढे अनुनासिक आले तर व्यंजनाचे वरील नियमाप्रमाणे त्याच्या वर्गातील तिसरे व्यंजन होते किंवा अनुनासिक होते. उदाहरणार्थ १. षड्-मासा = षङ्मासा किंवा षण्मासा; २. अनारम्भात् - नैष्कर्म्यम् = अनारम्भानैष्कर्म्यम्, चित+ भय = चिन्मयम्, मृद्+मय = मृण्मयम्. ``यरोऽनुनासिकऽनु नासिको वा ८-४-४५ प्रत्ययेभाषायां नित्यम् ८. ``स्तोः श्चुन्तः चुः'' ८-४-४ ``ष्टुनाष्टः'' ८-४-४१ या सूत्रानुसार ``त'' वगांतील घ्यंजनांपुढे ``च'' वर्गातील व्यंजन आले तर ``त'' वर्गाचा ``च'' वर्ग होतो. आणि ``ट'' वर्गातील व्यंजन आले तर ``ट'' वर्ग होतो. उदाहरणार्थ १. तत्-च = तच्च; यत्- चंद्रमासि = यच्चंद्रमासि २. यत् - ज्ञात्वा = यज्ज्ञात्वा; यत् - ज्ञानम् = यज्ज्ञानम् ३. स्पृशन् - जिघ्रन् = स्पृशञ्जिघ्रन् ९.पदान्त ``न''च्या पुढे ``च'', ``छ'' आले तर ``न''च्या स्थानी अनुस्वार व ``श'' येतात. ``ट'', ``ठ'' आले तर अनुस्वार आणि ``ष'' येतात आणि ``त'', ``थ'' आले तर अनुस्वार आणि ``स'' येतात. उदाहरणार्थ १. ऋषीन् - च = ऋषीश्च; २. तान् - तथा = तांस्तथा, ३. प्रज्ञावादान्-च । = प्रज्ञावादांश्च, ४. पुमांश्चरति, ५. ऋषींश्च, ६. उरगांश्च, ७. अगतासूंश्च, ८. प्राणांस्त्यक्त्वा, ९. तांस्तितिक्षस्व इत्यादि. १०. ``त'' वर्गापुढे ``ल'' आला तर ``त'' वर्गाचा ``ल'' होतो आणि ``न''च्या पुढे ``ल'' आला तर मात्र सानुनासिक ``ल'' होतो. उदाहरणार्थ १. , आब्रह्मभुवनात् - लोकाः = आब्रह्मभुवनाल्लोकाः; २. इमान् - लोकान् = इमाल्लोकान् ३. श्रद्धावान् - लभते = श्रद्धावाँल्लभते; ४. शुमान् - लोकान् = शुमाँल्लोकान्. ११. अनुनासिकांखेरीज कोणत्याही पदान्त स्पर्श - व्यंजनापुढे ``श'' आला तर त्याच्या विकल्पाने ``छ'' होतो. उदाहरणार्थ १. तस्मात् - शास्त्रम् = तस्माच्छास्त्रम्, २. यत्-श्रेयः = यच्छ्रेयः, ३. व्यासप्रसादात्-श्रुतवान् = व्यासप्रसादाच्छुतवान्, ४. एतात् - श्रुतम् = एतच्छुतम् १२. अनुनासिकांखेरीज कोणत्याहि ``स्पर्श'' - व्यंजनापुढे ``ह'' आला तर त्या ``ह''च्या स्थानी विकल्पाने मागील व्यंजनाच्या वर्गातील चौथे- चवथे व्यंजन होते. उदाहरणार्थ १. एतत् - हि = एतद्धि, २. धर्म्यात्-हि = धर्म्याध्दि १३. विसर्गाच्यामागे ``अ'' असून पुढे ``अ'' किंवा मृदुव्यंजन आले तर ``अ'' आणि विसर्ग या दोन्हींचा मिळून ``ओ'' होतो. उदाहरणार्थ १. मन्त्रः- अहम् - = मन्त्रोऽहम्, २. स्त्रियः- वैश्याः = स्त्रियोवैश्याः १४. विसर्गाच्यामागे ``अ'' येऊन पुढे ``अ'' खेरीजचा कोणताहि ``स्वर'' आला तर विसर्गाचा लोप होतो आणि उर्वरित राहिलेल्या स्वरांचा संधि होत नाही. उदाहरणार्थ १. अक्षरः- इति = अक्षर‍इति, २. दुःखयोनयः - एव = दुःखयोनयएव, ३. यः- आस्ते =यास्ते १५. विसर्गाच्यामागे ``आ येऊन पुढे कोणताहि ``स्वर'' किंवा ``मृदु'' व्यंजन आले तर विसर्गाचा लोप होतो आणि उर्वरित राहिलेल्या स्वरांचा सन्धि होत नाही. उदाहरणार्थ १. सात्त्विकाः - भावाः = सात्विकाभावाः,२. धार्तराष्ट्रा ः- रणे = धार्तराष्ट्रारणे १६. विसर्गाच्यामागे ``अ, आ'' खेरीज कोणताही ``स्वर'' येऊन पुढे ``स्वर'' ः किंवा मृदु व्यंजन आले तर विसर्गाचा ``र'' होतो. उदाहरणार्थ १. केवलैः- इंद्रियैः- अपि = केवलैरिन्द्रियैरपि, २. त्रिभिः - गुणमयः - भावः = त्रिभिर्गुणमयैर्भावैः १७. विसर्गाच्यापुढे ``च, छ'' आले तर विसर्गाचा ``श'' होतो, ``ट्, ठ'' आले तर ``ष'' होतो आणि ``त्, थ्'' आले तर ``स्'' होतो. उदाहरणार्थ १. अकर्मः- च = अकर्मणश्च, २. द्रौपदेयाः- च = द्रौपदेयाश्च, ३. काम :-तैः-तैः = कामैस्तैस्तैः. १८. ``सः'' आणि ``एषः'' यांच्यापुढे ``अ'' खेरीज कोणताही ``वर्ण'' आला तर त्यांच्या विसर्गाचा लोप होतो. उदाहरणार्थ १. सः- याति = सयाति २. कामः एषः क्रोधः एषःः रजोगुणसमुद्भवः = काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः Encoded and proofread by Manish Gavkar manishyg at gmail.com
% Text title            : Pronunciation Rules for Sanskrit Explained in Marathi
% File name             : saMskRRitasaghanauchchArapaddhatimarAThI.itx
% itxtitle              : saMskRRita saghana uchchAra paddhati marAThI
% engtitle              : saMskRRitasaghanauchchArapaddhatimarAThI
% Category              : misc, advice, marAThI
% Location              : doc_z_misc_general
% Sublocation           : misc
% Language              : Marathi
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Transliterated by     : Manish Gavkar manishyg at gmail.com
% Proofread by          : Manish Gavkar manishyg at gmail.com
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : December 27, 2020
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org