$1
चर्पटपंजरी मराठी समवृत्त भावार्थ
$1

चर्पटपंजरी मराठी समवृत्त भावार्थ

(श्री आद्य शंकराचार्य यांच्या चर्पटपंजरीवर आधारित) रचना: श्री. मधुकर सोनवणे भज गोविंदा, भज गोविंदा, वेड्या भक्ति करी हरिची । येईल मृत्यू समोर तेंव्हां, व्यर्थचि रे पोपटपंची ॥ १॥ सोड तू वेड्या हांव धनाची, कांस धरी रे निजरूपाची । जेही लाभे प्राक्तन योगे, तृप्ती तेणे हो चित्ताची ॥ २॥ यौवन वैभव बघुनि नारीचे, मोहि गुंतशी कां वेड्या । रक्त मांस चरबीच्या नश्वर, अस्थींच्या देही काड्या ॥ ३॥ कमलदलीच्या जलबिन्दू सम, जीवन अवघे एक क्षणाचे । झुरे देह चिंता व्याधीने, तो तर भक्षची रे काळाचे ॥ ४॥ कमाविशी जोवरी तोवरी, तुझा कळवळा स्नेहिजना । पराधीन होता म्हातारा, कवडीचीही किंमत ना ॥ ५॥ जोवरी देही प्राणज्योति तंव, तोवरी पुसतील कुशल तुला । देह अयोध्या राम सोडिता, शिवे न भार्या प्रेताला ॥ ६॥ संपे खेळातची बालपण, अर्थ काम यौवनी तसे । करीत चिंता, वृद्ध जाहला, आठव हरिचा परी नसे ॥ ७॥ म्हणशी पत्नी, पुत्रही माझे, तुला न माहित तू कोणाचा । आला कोठूनि, कुठे चालला, शोध करि रे तू सत्याचा ॥ ८॥ सत्संगाने, निःसंगत्वाचा, लाभे त्यातुनी निर्मोहत्व । निर्मोहत्वे निश्चलतत्त्व नि, प्रतीत त्यातुनी ईश्वरतत्त्व ॥ ९॥ जर्जर देही कामवासना, सुकले जल जणु सरोवरी । कवडि न हाती, दूर आप्तजन, तत्त्वचि नेइल पैलतिरी ॥ १०॥ धन यौवन नि सगे सोबती, गर्व सोड हे क्षणीक सारे । माया बंधा तोडुनी मिळवी, सत्य असे जे कालातीत रे ॥ ११॥ दिवस रात्र नि सकाळ संध्या, शिशिर वसंतही पुनःपुन्हा । जीवन धावे काळासंगे, आशाबंधन सुटेचि ना ॥ १२॥ धन नि कांता नकोच चिंता, वेड्या कुणी ना मार्ग दाविला । घेई आसरा सत्पुरुषांचा, तरुनि जावया भव अब्धिला ॥ १३॥ जटाधारि कुणी चमनचकोटा, भगवे कुणी ते संन्यासी । पोटासाठी सोंगे नाना, परि न भजती गोविंदासी ॥ १४॥ जर्जर गात्रे, कंपित काया, केशकलाप न वय लपवी । मंद चाल ती टेकित काठी, आशा परि बांधुनि ठेवी ॥ १५॥ आग पोटीची, घड्याळ तैसे, अखंड धावत तुज ठेवी । चार घास नि झोप अपुरी, आशा बांधुनी तुज फिरवी ॥ १६॥ कुरुते गङ्गासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम् । ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन ॥ १७॥ मंदिरी वा तू वृक्षाखाली, निवास करि साध्या वस्त्राने । भू वरी शय्या, पूर्ण विरागी, नित्य राही तू संतोषाने ॥ १८॥ रमता योगी अथवा भोगी, कांही लाभे रिक्त हात वा । देह करि साऱ्या व्यापारा, स्वानंदाची कधि न वानवा ॥ १९॥ वाच जरा तू भगवद्गीता, प्राशी गंगाजला जरा । चरण आठवी तू श्रीहरिचे, यमा कोठला मग थारा ॥ २०॥ पुन्हा जन्म नि मरण पुन्हा ते, नऊ मास जननी उदरी । हा भवसागर अतीच दुस्तर, वेड्या हरिचरणासी धरी ॥ २१॥ कवडी कवडी गोळा करुनी, खोपे केले वाळूंचे । पापपुण्य ना केली चिंता, बीज पेरले बाभळीचे ॥ २२॥ असे कोण तू, आला कोठुनि, किती जाहले माय पिता । शोधि उत्तरे अंतरात तू, नाटकापरी सर्व वृथा ॥ २३॥ मजमाझी नि तुजमाझीही चराचरहि विष्णुमय सारे । भेद ना करि सान थोर हा, समभावे जा शरण त्यास रे ॥ २४॥ शत्रुमित्र वा पुत्र बंधु ही ओळख विसरी अलगपणाची । पाही सकला निजरूपाने, नित्य प्रतीति अद्वैताची ॥ २५॥ क्रोध लोभ कामना मोह हे, सोड नि शोधी आत्मरुपाला । स्वबोध नसता अंधचि पुरता, अविरत भोगी तो नरकाला ॥ २६॥ वाच कधी तू गीता भागवत, ज्ञानेश्वरी नि कधी गाथा । नित्य आठवी हरिचरणाशी, सत्संगे हरि दीन व्यथा ॥ २७॥ भोग भोगिता, वाटे सुख परि, पुढच्या व्याधी साठविशी । अटळ मृत्यू तो निश्चित येई, दुश्चरणा कां आचरिशी ॥ २८॥ अर्थ असे तो अनर्थ नुसता, कधि न लाभते सौख्य तयाने । धनवंताला नित्य भय असे, स्वपुत्र फसविल कधी न जाणे ॥ २९॥ प्राणायाम नि प्रत्याहारे, नित्यानित्य विवेक विचारे । सत्य नि माया भेद यातला, शोधुनी स्मर त्या भगवंता रे ॥ ३०॥ श्रीगुरूच्या पदकमली आश्रय, सोड पाश हे संसाराचे । इंद्रिये नि मन नित्य संयमे, अनुभवी हृदयी सदन हरीचे ॥ ३१॥ नाद सोडी तू शास्त्र विधींचा, आचार्यांचा मार्ग अनुसरी । दिव्यत्वाला ओळख आपुल्या, नकोच गुंतू या संसारी ॥ ३२॥ भज गोविंदा, गोविंदा भज, वेड्या स्मर त्या गोविंदाला । इशस्मरणाविण अन्य मार्ग ना, जाया तरुनी भवाब्धिला ॥ ३३॥ चार दिसांचा असशी पाहुणा, इथले कांही तुझे नसे । हे माझे नि तेही माझे, मनात भरले तुझ्या पिसे ॥ दुर्मिळ जीवन वाया जाते, खेळी अडकला मायेच्या । नको मृगजळासाठी धावू, शरणी जा गोविंदाच्या ॥ जागृत होई, झडकरि वेड्या, जितुके क्षण तुझिया हाती । एक एक क्षण बहुमोलाचा, नको करू त्याची माती ॥ Composed by Madhukar Sonavane msonavane at hotmail.com (aNNA) Posting on Mandiyali Google Group
$1
% Text title            : Charpatapamjari Translated in Marathi in Same Metre
% File name             : charpaTapaMjarImarAThI.itx
% itxtitle              : bhaja govindam charpaTapaMjarI (marAThI samavRitta bhAShAntara)
% engtitle              : charpaTapaMjarI bhaja govindam in marAThI
% Category              : vishhnu, vedanta, krishna, shankarAchArya, vishnu
% Location              : doc_vishhnu
% Sublocation           : vishhnu
% SubDeity              : krishna
% Author                : Madhukar Sonavane msonavane at hotmail.com
% Language              : Marathi
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Transliterated by     : Madhukar Sonavane msonavane at hotmail.com
% Indexextra            : (Sanskrit, English)
% Acknowledge-Permission: Madhukar Sonavane
% Latest update         : March 10, 2020
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org