श्रीमद्भागवतसुभाषितानि सार्थ मराठी

श्रीमद्भागवतसुभाषितानि सार्थ मराठी

१ अचक्षुरन्धस्य यथाग्रणीः कृतः तथा जनस्याविदुषोऽबुधो गुरुः ॥ ८.२४.५० ज्याप्रमाणे आंधळ्या मनुष्यानें आंधळा मनुष्य आपला पुढारी केला असता त्यापासून काहीएक उपयोग होत नाही, त्याप्रमाणे ज्ञान नसलेल्या लोकांनी अडाणी गुरु केला असता त्याचा कांहीं एक उपयोग होत नाही. २ अज्ञानादथवाज्ञानादुत्तमश्लोकनाम यत् । सङ्कीर्तितमघं पुंसो दहेदेषो यथानलः ॥ ६.२.१८ ज्या प्रमाणे जाणूनबुजुन टाकलेला किंवा नकळत पडलेला अग्नि काष्ठें जाळून टाकतो, त्याप्रमाणे पवित्र कीर्ति असलेल्या परमेश्वराचें नांव समजून उच्चारिलें किंवा त्याचा सहज उच्चार झाला तरी ते नांव मनुष्याचे पातक नाहींसें करुन टाकतें. ३ अणुभ्यश्च महद्भधश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात्पुष्पेभ्य इव षट्पदः ॥ ११.८.१० ज्याप्रमाणे भ्रमर लहान मोठ्या फुलांतील रस ग्रहण करितो त्याप्रमाणे विवेकी मनुष्याने लहानमोठ्या सर्व शास्त्रांतील महत्त्वाचा भाग ग्रहण करावा. ४ अण्वप्युपाहृतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव व मे भवेत् । भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोपाय कल्पते ॥ १०.८१.३ (श्री कृष्ण सुदाम्याला म्हणाले।) भक्तांनी प्रेमाने अर्पण केलेली वस्तू थोडी जरी असली तरी ती मला पुष्कळ वाटते. आणि अभक्तांनी पुष्कळ वस्तू जरी अर्पण केल्या तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ५ अनागतमतीतं च वर्तमानमतीन्द्रियम् । विप्रकृष्टं व्यवहितं सम्यक् पश्यन्ति योगिनः१०.६१.२१ पुढे होणाऱ्या, पूर्वी झालेल्या आणि वर्तमानकाळी इंद्रियांना न समजणाऱ्या, दूर असलेल्या, मध्ये पडदा भिंत इत्यादि व्यवधान असल्यामुळे न दिसणाऱ्या सर्व वस्तूंना योगी लोक प्रत्यक्ष पाहतात. ६ अनापृष्टमपिब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः ॥ ३.७.३६ दीनांवर दया करणारे गुरु न विचारलेल्या देखील गोष्टींबद्दल सांगत असतात. ७ अयंहि परमो लाभो नृणां साधुसमागमः ॥ १२.१०.७ साधूंचा समागम घडणे हा मनुष्यांना मोठाच लाभ होय. ८ अरयोऽपि हि संधेयाः सति कार्यार्थगौरवे । अहिमूषकवद्देवा ह्यर्थस्य पदवीं गतैः ॥ ८.६.२० (समुद्रमंथनाचेपूर्वी दैत्यांशी सख्य करा, असें भगवान विष्णूंनी देवांना सांगितले) देवहो, एखादे मोठे कार्य घडवून आणण्यासाठी शत्रुंबरोबर सुद्धा मैत्री केली पाहिजे. ती तुम्ही करा आणि तुमचा कार्यभाग झाल्यावर सर्प उंदरांना गिळून टाकतो त्या प्रमाणे दैत्यांचा नाश करा. ९ असतः श्री मदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ॥ १०.१०.१३ संपत्ती च्या मदाने अंध झाल्यामुळे कर्तव्याकर्तव्य न पाहणाऱ्या विवेकशून्य पुरुषाला दारिद्र्य हेच उत्तम अंजन होय. कारण दरिद्री पुरुष आपल्यासारखींच दुःखें सर्वांना प्राप्त होत असतील असे निश्चयाने जाणतो. १० अहं भक्तपराधीनो ह्यस्वतन्त्र इव द्विज ॥ ९.४.६३ (श्रीभगवान् विष्णु सुदर्शन चक्राने पीडित झालेल्या दुर्वास ऋषींना म्हणाले) हे ब्राह्मणा, मी भक्ताच्या अधीन आहे, यामुळे तुझ्या रक्षणाविषयीं स्वतंत्र असल्यासारखा नाही. ११ अहो दैन्यमहो कष्टं पारक्यैः क्षणभंगुरैः । यन्नोपकुर्यादस्वार्थैर्मर्त्यः स्वज्ञातिविग्रहैः ॥ ६.१०.१० द्रव्य, पुत्रादिक बांधव व शरीर यांची स्थिति अशी आहे का, यांचा स्वतःला उपयोग होत नाही, यांना कोल्ही कुत्री खाऊन टाकणार व यांचा क्षणाचाही भरंवसा नाही. तेव्हा यांच्या योगाने मनुष्याने कोणावरही उपकार न करणे ही किती तरी दैन्याची ब दुःखाची गोष्ट आहे. १२ आयुः श्रियं यशो धर्म लोकानाशिष एव च । हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः ॥ १०.४.४६ सज्जनांचा छळ केला असतां मनुष्याचे आयुष्य, संपत्ति, यश, धर्म, उत्तमलोकप्राप्ति, आशीर्वाद, कल्याणकारक गोष्टी या सर्वांचा नाश होतो. १३ आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ॥ १.८.४४ आशा धरण हे अतिशय दु:खाचे कारण आहे. आणि आशा नसणे हे परम सुखाचे कारण आहे. १४ इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः । वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ ११.८.२० आहाराचा त्याग करणारे विचारी पुरुष रसनेंद्रियाशिवाय बाकीच्या सर्व इंद्रियांना जिंकतात. परंतु अन्नरहित पुरुषांचे रसनेंद्रिय वाढत जाते (रसाविषयी अधिक आसक्ति उत्पन्न होते) १५ ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् । तेषां यत्स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत्समाचरेत् ॥ १०.३३.३२ समर्थ पुरुषांचे भाषण सत्य असते. उपदेशाप्रमाणे त्यांचं आचरण कचित् असते. म्हणून बुद्धिमान मनुष्याने त्यांच्या उपदेशाला अनुसरून असलेल्या आचाराचे आचरण करावे. १६ उत्तमश्चिन्तितं कुर्यात्प्रोक्तकारी तु मध्यमः । अधमोऽश्रद्धया कुर्यादकर्तोच्चरितं पितुः ॥ ९.१८.४४ जो मुलगा बापाच्या मनांत असलेले कार्य करितो तो उत्तम, जो सांगितलेले करितो तो मध्यम, जो सांगितलेले अश्रद्धेने करितो तो कनिष्ठ आणि जो बापाचे सांगणे अश्रद्धेनेंसुद्धा करीत नाही तो केवळ विष्ठेसारखाच होय. १७ उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते । अपि निर्मुक्तसङ्गस्य कामरक्तस्य किं पुनः ॥ ३.२२.१२ सर्वसंग परित्याग केलेल्या पुरुषाला देखील स्वतः प्राप्त झालेल्या विषयाचा अव्हेर करणे योग्य नाही, मग विषयासक्त पुरुषाला तो कोठून योग्य होईल? १८ एकः प्रसूयते जन्तुरेक एव प्रलीयते । एकोऽनुभुङ्क्ते सुकृतमेक एवच दुष्कृतम् ॥ १०.४९.२१ प्राणी एकटाच जन्मास येतो, (स्त्रीपुत्रादिकांसह जन्मास येत नाही) व एकटाच मरण पावतो. तसेंच पुण्याचे फळ सुख एकटाच भोगतो व पापाचे फळ दुःखसुद्धा एकटाच भोगितो. १९ एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् । यद्वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥ १०.८०.४१ उत्तम शिष्यांनी गुरूंच्या उपकारांची फेड हीच करावी की, सर्व पुरुषार्थ ज्यापासून प्राप्त होतात, तो देह शुद्धभक्तीने गुरूंना अपण करावा. २० एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः । वाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः ॥ ३.२४.१३ मुलांनी वडिलांची सेवा इतकीच करावयाची आहे की, त्यांच्या आशेचा स्वीकार 'ठीक आहे ' अशा बहुमानाने करावा. २१ एतावानव्ययो धर्मः पुण्यश्लोकैरुपासितः । यो भूतशोकहर्षाभ्यामात्मा शोचति हृष्यति ॥ ६.१०.९ प्राणिमात्राला दुःख झाले असतां ज्याला स्वतःला दुःख होते, व प्राणिमात्रांचे सुख पाहून ज्याला सुख होते अशा पुरुषाचा जो धर्म तोच अक्षय धर्म होय. कारण सत्कीर्तिमान् लोकांनी याच धर्माचे आचरण केले आहे. २२ एतावान् हि प्रभोरर्थो यद्दीनपरिपालनम् ॥ ८.७.३८ समर्थ पुरुषांचे हेंच कर्तव्य आहे की, त्यांनी दीन जनांचें परिपालन करावे. २३ एष राज्ञां परो धर्मो ह्यार्तानामार्तिनिग्रहः ॥ १.१७.११ पीडित झालेल्या लोकांचे दुःख निवारण करणे हाच राजांचा मुख्य धर्म आहे. २४ एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः । हृदयज्ञत्वमन्विच्छन् दम्यस्येवार्वतो मुहुः ॥ ११.२०.२१ शिक्षण देण्यास योग्य अशा उद्धट घोड्याला शिकवितांना ज्याप्रमाणे काही वेळ त्याच्या तंत्राने चालून हळूहळू त्याला योग्य तें वळण लावावे लागते, त्याप्रमाणे प्रथम काही प्रसंगी मनाच्या तंत्राने चालून शेवटीं तें मन पूर्णपणे ताब्यात आणावे. अशा रीतीने मनाचा निग्रह करणे हेच मोठे योगसाधन आहे. २५ कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव निलीयते । सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ॥ १०.२४.१३ प्राणी कर्माच्या योगानें उत्पन्न होतो, कर्माच्याच योगाने लय पावतो. सुख, दुःख, भय, आणि कल्याण ही सर्वही कर्माच्याच योगानें प्राप्त होतात. २६ कालो बलीयान्बलिनां भगवानीश्वरोऽव्ययः । प्रजाः कालयते क्रीडन् पशुपालो यथा पशून ॥ १०.५१.१९ काल हा सर्व बलिष्ठांमध्ये बलिष्ठ असून अविनाशी भगवान ईश्वर आहे. तो क्रीडा करीत असतां, ज्याप्रमाणे पशूंचे रक्षण करणारा पशूंना इकडे तिकडे नेतो, त्याप्रमाणे प्रजाजनांची घडामोड करितो. २७ किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा । किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥ ११.२६.१२ ज्याचे मन स्त्रियांनी आपल्या ताब्यांत ठेविले आहे (जो स्त्रीलंपट झाला आहे ) त्याच्या विद्येचा, तपाचा, त्यागाचा, अध्ययनाचा, एकान्तवासाचा आणि मौनाचा काय उपयोग आहे ? २८ किं दुर्मर्षं तितिक्षूणां किमकार्यमसाधुभिः । किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शिनाम् ॥ १०.७२.१९ सहनशील पुरुषांना दुःसह असे काहीच नाही. दुष्टांना अकार्य म्हणून काहीच नाहीं ( वाटेल ते दुष्कृत्य करण्याची त्यांची तयारी असते) देता येणार नाही असें दानशूर पुरुषांजवळ काय आहे ! (ते वाटेल ती वस्तू देऊन टाकतील) आणि समदृष्टि असलेल्या लोकांना परका असा कोणीच नाही. २९ किं प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैर् हार्यनैरिह । वरं मुहूर्तं विदितं घटेत श्रेयसे यतः ॥ २.१.१२ या लोकी सावध नसल्यामुळे अविचाराने केवळ विषयसेवनांत एखाद्या मनुष्याची पुष्कळ वर्षे निघून गेली तरी त्यांचा काय उपयोग आहे ! त्यापेक्षा ज्ञानाने युक्त अशा दोन घटकाही श्रेष्ठ होत, कारण मनुष्य त्या दोनघटकांमध्ये स्वहितासाठी यत्न करितो. ३० कोन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके । आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥ ११.१०.२० या जीवाच्या संनिध मृत्यु उभा आहे अशा स्थितीत कोणता धनादिपदार्थ किंवा शब्दादि विषय त्याला सुख देणार आहे ? वध्य पुरुषाला वध करण्याच्या जागेकडे नेत असतां त्यावेळी माळा, चंदन, मिष्टान्न इत्यादि पदार्थ दिले असतां ते त्याला सुखदायक होत नाहीत त्याप्रमाणे पुढे मृत्यु असलेल्या या जीवाला कोणताच पदार्थ संतोष उत्पन्न करीत नाही. ३१ कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान् भागवतानिह । दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ॥ ७.६.१ ज्ञात्या पुरुषाने या मनुष्यजन्मामध्येच व त्यातूनही कौमारावस्थेमध्येच भागवतधर्माचे आचरण करावे. कारण, हा मनुष्य जन्म दुर्लभ असून पुरुषार्थ साधून देणारा आहे, तथापि तो अशाश्वत आहे. ३२ गुरुर्न स स्यात्स्वजनो न स स्यात् पिता न स स्याज्जननी न सा स्यात् । दैवं न तत्स्यान्न पतिश्च स स्यात् न मोचयेद्यः समुपेतमृत्युम् ॥ ५.५.१८ आपल्याजवळ आलेल्या लोकांची मृत्यूपासून ज्याला सुटका करिता येत नाही, तो गुरु नव्हे स्वजन नव्हे, आणि पिता होण्याला योग्य नव्हे, ती माता नव्हे तें दैवत नव्हे तो पति नव्हे। (ज्याला आपले कर्तव्य बरोबर करिता येत नसेल त्याने ती ती पदवी प्राप्त करून घेऊ नये।) ३३ जन्मलाभः परः पुंसामन्ते नारायणस्मृतिः ॥ २.१.६ अंतकाळी नारायणाची स्मृति होणे हाच मनुष्यजन्म प्राप्त झाल्याचा मोठा लाभ होय. ३४ जातस्य मृत्युर्ध्रुव एष सर्वतः प्रतिक्रिया यस्य न चेह क्लृप्ता । लोको यशश्चाथ ततो यदि ह्यमुं को नाम मृत्युं न वृणीत युक्तम् ॥ ६.१०.३२ उत्पन्न झालेल्या प्राण्याला तो कोठेही गेला तरी मृत्यु निःसंशय येणारच. या लोकी मुत्यु टाळण्याचा उपाय ईश्वराने निर्माण केला नाही. म्हणून या मृत्यूपासून जर इहलोकीं यश आणि परलोकीं स्वर्ग ही प्राप्त होत असतील तर या प्राप्त झालेल्या योग्य मृत्यूचा कोण बरें स्वीकार करणार नाहीं ? सर्वही करितीलच. ३५ जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः । मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ ११.८.१९ ज्याप्रमाणे मासा आमिष लाविलेल्या गळाच्या (लोहकंटकाच्या) योगाने मृत्युमुखी पडतो, त्याप्रमाणे रससेवनाविषयी आसक्त झालेला दुर्बुद्धि मनुष्य उच्छंखल दुर्जय अशा जिह्वेच्या योगाने मृत्युमुखांत पडतो. ३६ जिह्वां क्वचित्संदशति स्वदद्भिः तद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ११.२३.५१ केव्हां तरी मनुष्य आपल्याच दांतांनी आपली जीभ चावतो त्यावेळी होणाऱ्या वेदनांमुळे त्याने कोणाबर रागे भरावें ? (दांतांना रागें भरून ताडण करावे तर आपणांलाच दुसरी पीडा होईल।) ३७ जीवितं मरणं जन्तोर्गतिः स्वेनैव कर्मणा । राजंस्ततोऽन्योनान्यस्य प्रदाता सुखदुःखयोः ॥ १२.६.२५ (बृहस्पति जनमेजयराजाला सांगतात।) हे राजा, जिवंत राहणे, मृत्यु येणे, स्वर्गादिलोकांची प्राप्ति होणे ही सर्व प्राण्याला आपल्या कर्माच्याच योगानें प्राप्त होत असतात. यासाठी दुसऱ्याला सुखदुःखें देणारा दुसरा कोणी नाही. ३८ तत्कर्म हरितोषं यत् सा विद्या तन्मतिर्यया ॥ ४.२९.४९ ज्याच्या योगाने ईश्वराला संतोष होतो तेच खरें कर्म होय. आणि जिच्या योगाने श्रीहरीकडे बुद्धि लागते, तीच खरी विद्या होय. ३९ तथारिभिर्न व्यथते शिलीमुखैः शेतेऽर्दिताङ्गो हृदयेन दूयता । स्वानां यथा वक्रधियां दुरुक्तिभिः दिवानिशं तप्यति मर्मताडितः ॥ ४.३.१९ ज्याप्रमाणे आपल्या कुटिलबुद्धि बांधवांच्या दुर्भाषणाने मर्मस्थानी ताडित झालेला पुरुष व्यथित झालेल्या अंतःकरणामुळे रात्रंदिवस संताप पावतो, त्याप्रमाणे शत्रुंनी बाणांच्या योगाने आंगाचे तुकडे पाडिले तरी संताप पावत नाही. कारण त्याला थोडी तरी झोप येते, परंतु मर्मभेद झालेल्याला मुळीच चैन पडत नाही. ४० तद्वै धनुस्त इषवः स रथो हयास्ते सोऽहं रथी नृपतयो यत आनमन्ति । सर्व क्षणेन तदभूदसदीशरिक्तं भस्मन्हुतं कुहकराद्धमिवोप्तमूष्याम् ॥ १.१५.११ (श्रीकृष्ण निजधामास गेल्यानंतर अर्जुनाचा गवळ्यांनी पराजय केला त्यासंबंधाने अर्जुन युधिष्ठिरास सांगतो।) संग्रामाचेवेळी राजे लोक ज्याला नमस्कार करीत असत, तेच गांडीव धनुष्य, तेच वाण, तोच अग्नीने दिलेला दिव्यरथ, तेच घोडे, तोच मी रथी पण हे सर्व साहित्य श्रीकृष्णरहित झाल्यामुळे एका क्षणांत व्यर्थ झाले. भस्मामध्ये केलेले हवन, मायावी पुरुषांपासून मिळविलेल्या वस्तु किंवा उखर म्हणजे खाऱ्या जमिनीत पेरलेले धान्य हीं ज्याप्रमाणे व्यर्थ होतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे अधिष्ठान नाहींसें झाल्याबरोबर माझें सर्व सामर्थ्य फुकट गेले. ४१ तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः । परमाराधनं तद्धि पुरुषस्याखिलात्मनः ॥ ८.७.४४ साधु पुरुष बहुतकरून लोकांच्या दुःखाने स्वतः दुःखी होतात। (लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी स्वतः दुःख भोगितात।) दुसऱ्याकरितां दुःख सहन करणं हाच सर्वात्म्या परमेश्वराचे उत्कृष्ट आराधन होय. ४२ तांस्तान्कामान्हरिर्दद्यात यान् यान् कामयते जनः । आराधितो यथैवैष तथा पुंसां फलोदयः ॥ ४.१३.३४ मनुष्य ज्या ज्या विषयांची इच्छा धारण करितो ते ते विषय श्रीहरि त्याला देतो. जसे हरीचे आराधन करावें, तशीच फलप्राप्ति मनुष्यांना होते. ४३ तावञ्जितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान् । न जयेद्रसनं यावज्जिवितं सर्वं जिते रसे ॥ ११.८.२१ इतर इंदिये जिंकणाऱ्या पुरुषाने जोपर्यन्त रसनेंद्रिय जिंकिलें नाही, तोपर्यंत तो जितेंद्रियच नव्हे. रसनेंद्रिय जिंकिलें असतां त्याने सर्व इंद्रिये जिंकिल्यासारखी आहेत. ४४ तावत्प्रमोदते स्वर्गे यावत्पुण्यं समाप्यते । क्षीणपुण्यः पतत्यर्वागनिच्छन्कालचालितः ॥ ११.१०.२६ प्राणी स्वर्गामध्ये पुण्य संपेपर्यंत विषयांचा उपभोग घेत असतां आनंद पावतो. परंतु पुण्य संपतांच तेथून पडण्याची इच्छा करीत नसतांही कालाने त्यास पाडिले म्हणजे तो खाली पडतो. ४५ दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गरः । तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ ११.२.२९ (निमिराजा कवि, हरि इत्यादि नऊ योगेश्वरांना म्हणाला) जीवांना क्षणभंगुर असलेलाही हा मनुष्यदेह दुर्लभ आहे; आणि त्या मनुष्यजन्मामध्येही भगवद्भक्तांचे दर्शन दुर्लभ आहे असे मी मानितो. ४६ दुष्करः को नु साधूनां दुस्त्यजो वा महात्मनाम् ९.५.१५ महात्म्या साधूंना करण्यास अथवा टाकण्यास कठीण असें काय आहे ! कांहींच नाही. ४७ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् । सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत् ॥ ११.१८.१६ दृष्टीने पाहून शुद्ध ठरलेल्या जागी पाऊल टाकावे, वस्त्राने गाळलेले पाणी प्यावे, सत्याने पवित्र अशी वाणी उच्चारावी आणि मनाने विचार करून शुद्ध असेल तेंच आचरण करावे. ४८ द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ । यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥ ११.९.४ या जगांत ज्यांना चिंता नाही, व जे परमानंदांत निमग्न आहेत, असे दोघेजणच आहेत. एक अज्ञानी उद्योगरहित बालक आणि दुसरा परमेश्वराशी ऐक्य पावलेला गुणातीत साधु. ४९ धर्मव्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसम् । तेजीयसां नदोषाय वन्हेः सर्वभुजो यथा ॥ १०.३३.३० नैतत्समाचरेज्जातु मनसापि ह्यनीश्वरः । विनश्यत्याचरन्मौढ्याद्यथा रुद्रोऽब्धिजं विषम् ॥ १०.३३.३१ पवित्र असलेल्या सर्वभक्षक अग्नीने जरी अमंगल पदार्थ जाळून टाकिले तरी त्यामुळे तो जसा अपवित्र होत नाही, त्याप्रमाणे तेजस्वी समर्थ पुरुषांच्या हातून धर्ममर्यादांचे उल्लंघन आणि भलत्याच गोष्टी करण्याचे साहस जरी झाले, तरी त्यांना दोष लागत नाही. शंकरांनी कालकूट विष भक्षण केले, म्हणून दुसरा सामान्य पुरुप तसे करण्यास प्रवृत्त होईल, तर तो जसा नाश पावेल, त्याप्रमाणे मूर्खपणामुळे शास्त्रविरुद्ध कर्म करणारा नाश पावेल. समर्थ नसलेल्या पुरुषाने शास्त्रविरुद्ध कर्म मनानेही आचरण करूं नये. ५० धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छेच्छ्रेय आत्मनः । एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम् ॥ ४.८.४१ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ साधल्याने कल्याण प्राप्त होते. हे कल्याणकारक पुरुषार्थ साधण्यास श्रीहरीच्या चरणांचे सेवन करणे हेच एक साधन आहे. ५१ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥ ९.१९.१४ ज्याप्रमाणे अग्नि हा तूप इत्यादि हवनीय द्रव्यांच्या योगाने शांत न होतां अधिकच प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे विषयांच्या उपभोगाने विषय भोगण्याची इच्छा कधीही शांत होत नाही. उलट वाढतच जाते. ५२ न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः । यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ११.२३.३ मर्मस्थळी लागलेल्या दुर्जनांच्या कठोर वाग्बाणांनी पुरुष दुःखाने जसा संतप्त होतो, तसा मर्मस्थानी लागलेल्या लोहमय खऱ्या बाणांनी विद्ध झालेलाही पुरुष संतप्त होत नाही. ५३ ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम् । यदि वेद न याचेत नेति नाह यदीश्वरः ॥ ६.१०.६ खरोखर स्वार्थाविषयीं तत्पर असलेल्या लोकांना दुसऱ्याचे संकट समजत नाही, जर समजेल तर ते याचनाच करणार नाहीत. तसेच ज्याच्यापाशी याचना केली. तो जर देण्यास समर्थ असेल व दुसन्याचे संकट जाणणारा असेल तर देत नाही असे कधीच म्हणणार नाही. ५४ न वै शूरा विकत्थन्ते दर्शयन्त्येव पौरुषम् ॥ १०.५०.२० शूर पुरुष आपली स्वतःची स्तुति करीत नाहीत, तर स्तुतीला कारण असलेला पराक्रमच करून दाखवितात. ५५ न संरम्भेण सिध्यन्ति सर्वेऽर्थाः सान्त्वया यथा ॥ ८.६.२४ सामोपचाराने जशी कायें सिद्ध होतात तशी रागानें होत नाहीत. ५६ न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन् । अब्रुवन्विब्रुवन्नज्ञो नरः किल्बिषमश्नुते ॥ १०.४४.१० सभासदांचे दोष जाणणाऱ्या बुद्धिमान् मनुष्याने आधी सभेमध्येच ज्ॐ नये. कारण दोष जाणूनही न बोलेल, किंवा धर्मपक्षाच्या उलट बोलेल, अथवा विचारिले असता मी जाणत नाहीं असे म्हणेल, तर त्याला पाप लागते. ५७ नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ॥ ६.१.५३ कोणीही एक क्षणभर देखील कर्म केल्यावांचून कधीही राह शकत नाही. ५८ न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः । ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ १०.४८.३१ उदकाने युक्त असलेली तीथें ही तीर्थे नव्हत, असे नाही, त्याचप्रमाणे मातीचे व दगडाचे देव हे देव नव्हत अस नाही, परंतु ही तीर्थे व हे देव पुष्कळ काळपर्यंत सेवा केली असतां पवित्र करितात आणि साधुलोक त्यांचे दर्शन होतांच पवित्र करितात. ५९ नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् । प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् ॥ १२.१३.२३ ज्याचे नामसंकीर्तन केले असतां ते सर्व पातकांचा नाश करितें, व ज्याला नमस्कार केला असतां सकल दुःखांचा नाश होतो, त्या सर्वोत्तम श्रीहरीला मी नमस्कार करितो. ६० नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ ११.२०.१७ (श्रीभगवान् कृष्ण उद्धवाला सांगतात) सर्व उत्कृष्ट फळे प्राप्त करून देण्याचे मुख्य साधन हा नरदेह आहे. हा कोट्यवधि उद्योगांनीही प्राप्त होणारा नाहीं तथापि सहज प्राप्त झाला आहे. ही नरदेहरूपी नौका चांगल्या प्रकारची आहे. गुरु हा तिच्या मधील नावाडी होय. वारा अनुकूल असला म्हणजे नाव चांगल्या तऱ्हेने चालते त्याप्रमाणे माझें स्मरण केले असता मी अनुकूल होऊन प्रेरणा करितो अशा त-हेची सर्व सामग्री असलेली ही नरदेहरूपी नौका प्राप्त झाली असतां, जो संसाररूपी सागर तरून जात नाहीं, तो आत्मघातकीच समजावा. ६१ नेह चात्यन्तसंवासः कर्हिचित्केनचित्सह । राजन्स्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः१०.४९.२०. (अक्रूर घृतराष्ट्र राजाला सांगतो ) हे राजा, यालोकी कोणत्याही प्राण्याचा कोणाही प्राण्याबरोबर केव्हाही निरंतर एकत्र सहवास घडत नाही. अत्यंत प्रिय असलेल्या आपल्या देहावरोवर सुद्धा निरंतर सहवास घडत नाही. मग स्त्रीपुत्रादिकांबरोबर घडत नाही, हे काय सांगावें? ६२ नैकत्र प्रियसंवासः सुहृदां चित्रकर्मणाम् । ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा ॥ १०.५.२५ ज्याप्रमाणे उदक प्रवाहाच्या ओघाने वाहून जाणाऱ्या तृणकाष्ठादिकांची स्थिति एके ठिकाणी घडत नाही, त्याप्रमाणे चित्रविचित्र कर्में असणाऱ्या सुहृज्जनांचा प्रिय असलेला समागम एका ठिकाणी कायमचा घडत नाही. ६३ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ १०.८१.४ (श्रीकृष्ण सुदाम्याला सांगतात) जो कोणी मला पान, फूल, फळ आणि पाणी यांपैकी काहीही भक्तीने अर्पण करितो त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याने ते भक्तीने अर्पण केलेले मी सेवन करितो (आनंदाने ग्रहण करितो ) ६४ पथि च्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं गृहे स्थितं तद्विहतं विनश्यति । जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो वने गृहेऽपि गुप्तोस्य हतो न जीवति ॥ ७.२.४० ईश्वराने रक्षण केलेली वस्तू मार्गामध्येही पडली असता तशीच राहते, तिला कोणी नेत नाही. आणि ज्या वस्तूची ईश्वराने उपेक्षा केली ती घरामध्ये असली तरी नाहीशी होते. त्याचप्रमाणे एखादा पुरुष अनाथ असूनही ईश्वराने त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येही जिवंत राहतोच. आणि ईश्वराने ज्याची उपेक्षा केली तो पुरुष घरामध्ये सुरक्षित असूनही जगत नाही. ६५ परोऽप्यपत्यं हितकृद्यौषधं स्वदेहजोऽप्यामयवत्सुतोऽहितः । छिन्द्यात्तदङ्गं यदुतात्मनोऽहितं शेषं सुखं जीवति यद्विवर्जनात् ॥ ७.५.३७ परिणामी हितकारक असणाऱ्या औषधाप्रमाणे एखादा परका पुरुष जर आपला हितकर्ता असेल तर तो आपलें अपत्यच समजला पाहिजे. आणि प्रत्यक्ष औरस पुत्र असूनही अहित करणारा असेल, तर तो रोगाप्रमाणे शत्रू समजला पाहिजे. फार तर काय शरीराचा एखादा अवयव आपणांस अपायकारक असेल तर तो तोडन टाकावा. कारण तेवढ्या भागाचा त्याग केला असता बाकीचे शरीर सुखाने जिवंत राहते. ६६ पुत्रदाराप्तबन्धूनां सङ्गमः पान्थसङ्गमः ॥ ११.७.५३ पुत्र, स्त्री, आप्त आणि बांधव यांचा समागम केवळ पांथस्थ लोकांच्या सहवासासारखा क्षणिक आहे. ६७ पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः ॥ १०.७७.१९ शूर पुरुष युद्धामध्ये पुष्कळ बोलून न दाखवितां आपला पराकमच करून दाखवितात. ६८ प्रभवो ह्यात्मनः स्तोत्रं जुगुप्सन्त्यपि विश्रुताः ४.१५.२५ प्रख्यात असलेले समर्थ पुरुष आपल्या वर्णनीय पराक्रमाचीही स्तुति करवीत नाहीत. स्तुति ऐकण्याचा त्यांस कंटाळा येतो. ६९ प्रायेणाभ्यर्चितो देवो ये प्रजा गृहमेधिनः । कदपत्यभृतं दुःखं ये न विन्दन्ति दुर्भरम् ॥ ४.१३.४३ जे गृहस्थ निपुत्रिक आहेत त्यांनी बहुतकरून देवाचे चांगले पूजन केले असले पाहिजे. कारण त्यांना कुपुत्रापासून होणारे अतिशय दुःसह दुःख मुळीच सोसावे लागत नाही। (संतानापेक्षा निसंतान बरे।) ७० बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥ ११.१८.२२ इंद्रिये विषयासक्त होणे हाच बंध व इंद्रियें विषयांपासून आवरून धरणे हाच मोक्ष होय. ७१ ब्राह्मणस्यहि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते । कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च ॥ ११.१७.४२ ब्राहाणाचा देह संसारांतील तुच्छ विषय भोगण्यासाठी नाहीं तर या लोकी जिवंत असेपर्यंत कष्ट करून तप करण्याकरिता आणि मरण पावल्या नंतर परलोकी अनंत सुख भोगण्या करितां आहे. ७२ ब्राह्मणः समदृक् शान्तो दीनानां समुपेक्षकः । स्रवते ब्रह्म तस्यापि भिन्नभाण्डात्पयो यथा ॥ ४.१४१४१ सर्व ठिकाणी समदृष्टि ठेवणारा व शांत असा ब्राह्मणही जर दीन जनांची उपेक्षा करील तर त्याचेही तप ज्याप्रमाणे फुटक्या भांड्यांतून पाणी हळूहळू पाझरून जाते त्याप्रमाणे उत्तरोत्तर क्षीण होत जाऊन शेवटी नाहीसे होतें. ७३ युः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥ १.१.१८ गुरु प्रेमळ शिष्याला रहस्यही सांगतात. ७४ भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात् यतः स आस्ते सहपट्सपत्नः । जितेन्द्रियस्यात्मरतेर्बुधस्य गृहाश्रमः किंनु करोत्यवद्यम् ॥ ५.१.१७ आसक्ति उत्पन्न होईल या भीतीने इंद्रिये स्वाधीन नसलेला मनुष्य या वनांतून त्यावनांत जरी फिरत राहिला, तथापि तेथें त्याला संसारभय प्राप्त होतेच. कारण त्याच्या बरोबर कामकोधादि सहा शत्रु असतातच, बरें इंद्रिये जिंकून आत्मस्वरूपी रममाण असणारा ज्ञाता पुरुष गृहस्थाश्रमांत राहिला तरी त्याचे काय नुकसान होणार आहे ! काही नाही. ७५ भूतानामिह संवासः प्रपायामिव सुब्रुते ॥ ७.२.२१ (हिरण्यकशिपु आपल्या मातेला म्हणतो) हे सुव्रते माते, पाणपोईवर जमलेल्या लोकांचा सहवास जसा क्षणिक असतो, त्याप्रमाणे या लोकामध्ये प्राण्याचा समागम क्षणिक आहे. ७६ भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥ ११.२७.१८ (श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात।) ज्याच्या अंतःकरणांत भक्ति नाही, त्याने पुष्कळ उपचार अर्पण केले तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ७७ मौमान् रेणून् स विममे यो विष्णोर्वर्णयेद्गुणान् ॥ ८.५.६ श्रीविष्णूचे संपूर्ण गुण जो वर्णन करील, तो भूमीच्या रजःकणांचीही गणना करील. ७८ भ्रातरीशकृतः पाशो नृणां यः स्नेहसंज्ञितः । तं दुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम् ॥ १०.८४.६१ (वसुदेव नंदाला म्हणाला) हे दादा, स्नेह नांवाचा जो मनुप्यांना पाशच आहे तो ईश्वराने निर्माण केलेला असल्यामुळे शूर लोकांना व योगिजनांना देखील तोडण्यास मोठा कठीण आहे असं मी समजतो. ७९ मल्लानामशनिर्नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान् गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजांशास्ता स्वपित्रोः शिशुः । मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गतः साग्रजः ॥ १०.४३.१७ कंसाच्या रंगमंडपांत असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे श्रीकृष्ण भासला-चाणूरमुष्टिकादिक मल्लांना वन, सामान्य मनुष्यांना श्रेष्ठ पुरुष, स्त्रियांना मूर्तिमंत मदन, नंदादिक गोपांना स्वजन, दृष्टराजांना शासन करणारा, वसुदेव देवकी यांना बालक, कंसाला मृत्यु, अज्ञलोकांना मोठाच पराकम करणारा, योग्यांना परमात्मतत्त्व आणि यादवांना परमदेवता. याप्रमाणे श्रीकृष्ण बलरामासह रंगमंडपांत शिरला असतां ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे एकच असून अनेकप्रकारचा भासला. ८० महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्तेः ॥ ५.५.२ सत्पुरुषांची सेवा करणे हेच मुक्तीचे द्वार आहे, असे म्हणतात. ८१ मातरं पितरं वृद्धं भार्या साध्वी सुतं शिशुम् । गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोऽबिभ्रच्छृसन्मृतः ॥ १०.४५.७ जो पुरुष पालनपोषण करण्यास समर्थ असूनही वृद्ध आईबापांचें, पतिव्रतास्त्रीचे, लहान पुत्राचें, गुरूचें, ब्राह्मणाचे, व शरणागताचे रक्षण करीत नाही, तो जिवंत असून मेल्यासारखाच होय. ८२ मातरं पितरं भ्रातृन्सर्वांश्च सुहृदस्तथा । घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ॥ १०.१.६७ आपल्या प्राणांची तृप्ति करणारे व लोभी असलेले राजे बहुतकरून आई, बाप, भाऊ, त्याचप्रमाणे सर्वही मित्र यांचा सुद्धा वध करितात मग इतरांची कथा काय? ८३ मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते । अद्य वाब्दशतान्ते वा मुत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥ १०.१.३८ (वसुदेव कंसाला म्हणाला ) हे वीरा जन्मास आलेल्या प्राण्यांचा मृत्यु देहाबरोबरच उत्पन्न होतो, आज किंवा शंभर वर्षांनी तरी प्राण्यांना मृत्यु हा निश्चित प्राप्त होणार. ८४ मृत्युर्बुद्धिमताऽपोह्यो यावदुद्धिबलोदयम् । यद्यसौ न निवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः ॥ १०.१.४८ बुद्धिमान् पुरुषाने आपल्या बुद्धीची व बळाची पराकाष्ठा करून प्राप्त झालेला मृत्यु चुकवावा. प्रयत्न करूनही मृत्यु टाळतां आला नाही, तर त्या प्राण्याकडे काही दोष नाही. ८५ य उद्धरेत्करं राजा प्रजा धर्मेष्वशिक्षयन् । प्रजानां शमलं भुङ्क्ते भगं च स्वं जहाति सः ॥ ४.२१.२४ (पृथुराजा सभासदांना म्हणाला) जो राजा प्रजाजनांना धर्माविषयी शिक्षण न देतां त्यांच्यापासून करभार मात्र ग्रहण करितो, त्याला प्रजाजनांचें पाप भोगावे लागते. आणि तो आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. ८६ य उद्यतमनादृत्य कीनाशमभियाचते । क्षीयते तद्यशः स्फीतं मानश्रावज्ञया हतः ॥ ३.२२.१३ जो पुरुष न मागतां प्राप्त झालेल्या वस्तूचा अनादर करून पुढे त्या वस्तूची याचना एखाद्या कृपण मनुष्याजवळ करितो, त्या पुरुषाचे यश जरी सर्व ठिकाणी पसरलेले असले तरी ते नाश पावते, आणि लोकांमध्ये त्याची अवज्ञा होऊन मानखंडनाही होते. ८७ यत्पृथिव्यां ब्रीहियवं हिरण्यं पशवः खियः । न दुह्यन्ति मनःप्रीतिं पुंसः कामहतस्य ते ॥ ९.१९.१३ (ययाति देवयानीला म्हणतो) तांबूळ, जव, सोने, पशु, स्त्रिया इत्यादि पृथ्वीवरील सर्व विषय, विषयवासनांनी ग्रस्त झालेल्या पुरुषाच्या मनाला संतोष देण्यासाठी कधीही पुरे पडत नाहीत. ८८ यथा प्रयान्ति संयान्ति स्रोतोवेगेन वालुकाः । संयुज्यन्ते वियुज्यन्ते तथा कालेन देहिनः ॥ ६.१५.३ ज्याप्रमाणे ( नदीच्या) प्रवाहवेगाने वाळू एका ठिकाणी जमते व दूरही जाते. त्याप्रमाणे कालाच्या योगाने प्राण्यांचा समागम आणि वियोग हे घडत असतात. ८९ यदा न कुरुते भावं सर्वभूतेष्वमङ्गलम् । समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः ॥ ९.१९.१५ जो पुरुष प्राणिमात्राच्या अकल्याणाची इच्छा करीत नाही, आणि सर्वत्र समष्टि ठेवितो. त्याला सर्वही दिशा सुखमयच होतात. ९० यद्यदाचरति श्रेयानितरस्तत्तदीहते । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवतेते ॥ ६.२.४ श्रेष्ठ पुरुष जें जें कर्म करितो, ते तेच कर्म इतर लोकही करितात, व तो श्रेष्ठ पुरुष जें शास्त्र प्रमाण मानितो त्या शास्त्रालाच प्रमाण मानून इतर लोकही वागत असतात. ९१ ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः । तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित् ॥ १०.६०.१५ जात, कूळ, स्वरूपसौंदर्य, संपत्ति, ऐश्वर्य व उत्कर्ष ही परस्परांना अनुरूप ज्यांच्यामध्ये असतील त्यांच्यामध्येच विवाह, संबंध घडून येतो व मैत्री जडते. श्रेष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्ये विवाहसंबंध होत नाही. व अशा लोकांची मैत्रीही जुळत नाही. ९२ यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः । लोभः स्वल्पोऽपि तान् हन्तिश्चित्रो रूपमिवेप्सितम् ॥ १.२३.१६ ज्याप्रमाणे श्वेतकुष्ठाच्या योगाने सुंदर रूपाला कमीपणा येतो, त्याप्रमाणे स्वल्प असलेलाही लोभ यशस्वी पुरुषांच्या निर्मलयशाचा व गुणी पुरुषांच्या स्तुत्य गुणांचा नाश करितो. ९३ यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परंगतः । तावुभौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः ॥ ३.७.१७ देवादिकांच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असलेला परममूर्ख व प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमेश्वरस्वरूपाला प्राप्त झालेला ज्ञानी हे दोघे सुखाने राहतात. यांच्या स्थितींच्या मधल्या अवस्थेत असणारा हा मात्र अतिशय क्लेश भोगितो. ९४ यस्य राष्ट्र प्रजाः सर्वास्त्रस्यन्ते साध्व्यसाधुभिः । तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुर्भेगो गतिः ॥ १.१७.१० (परीक्षिति राजा गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला म्हणतो) हे साध्वि, ज्या राजाच्या राष्ट्रांतील निरपराधी लोकांना दृष्टांपासून त्रास उत्पन्न होतो, त्या मत्त झालेल्या राजाची कीर्ति, आयुष्य भाग्य व परलोक ही सर्वही नाश पावतात. ९५ या दुस्त्यजा दुर्मतिभिर्जीयतो या न जीर्यते । तां तृष्णां दुःखनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत् ॥ ९.१९.१६ दुर्बुद्धि असलेल्या पुरुषाला विषयतृष्णा सोडवत नाही. तो जरी वृद्ध झाला तरी विषयांची तृष्णा कमी होत नाही. या विषयतृष्णेमुळे अतिशय दुःखें प्राप्त होतात हे जाणून कल्याणेच्छु पुरुषाने हिचा सत्वर त्याग करावा. ९६ यावद्धियेत जठरं तावत्स्वत्वं हि देहिनाम् । अधिकं योऽभिमन्येत सस्तेनो दण्डमर्हति ॥ ७.१४.८ आपले पोट भरण्यास जितकें अन्न लागेल, तितकंच अन्न खरोखर आपले आहे असे म्हणता येईल. त्यापेक्षा अधिकावर जो आसक्ति ठेवितो तो केवळ चोर होय. तो दंडाला पात्र होतो. ९७ योऽनित्येन शरीरेण सतां गेयं यशो ध्रुवम् । ना चिनोति स्वयं कल्पः स वाच्यः शोच्य एव सः ॥ १०.७२.२० जो प्राणी स्वतः समर्थ असूनही आपल्या अनित्य शरीराने साधूंना गायन करण्यास योग्य असें शाश्वत यश संपादन करीत नाही, तो निंद्य होय व भाग्यहीनपणामुळे शोक करण्यासही योग्य होय. ९८ यो वा अनन्तस्य गुणाननन्तान् अनुक्रमिष्यन्स तु बालबुद्धिः । रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥ ११.४.२ जो पुरुष अनंताच्या अनंत गुणांची गणना करण्यास तयार होईल तो मंदबुद्धि समजला पाहिजे. कारण कोणी एखादा महाबुद्धिमान् पुरुष दीर्घकालपर्यंत मोठा प्रयत्न करून कदाचित भूमीच्या रजःकणांची गणना करील, परंतु सर्व शक्तींचा आश्रय अशा भगवंताच्या गुणांची गणना करण्यास तो समर्थ होणार नाही. ९९ राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम् । शासतोऽन्यान् यथाशास्त्रमनापद्युत्पथानिह ॥ १.१७.१६ आपत्काल नसतां भलत्याच मार्गाने (शास्त्र विरुद्ध मार्गाने) जाणाऱ्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचे निरंतर पालन करणे हाच राजाचा मुख्य धर्म होय. १०० लब्धा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः । तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावत् निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥ १.९.२९ अनित्य असूनही सर्व पुरुषार्थ साधून देणारा, म्हणूनच अत्यंत दुर्लभ असा नरदेह यालोकी पुष्कळ जन्म घेतल्यानंतर भाग्याने प्राप्त झाला असतां, हा वारंवार मरणारा आहे म्हणून जा पर्यंत हा देह पडला नाही, तोपर्यंतच धैर्यवान पुरुषाने मोठ्या त्वरेनें मोक्ष साधनासाठी यत्न करावा. केवळ विषयसेवन हे श्वानसूकरादिक योनींमध्येही प्राप्त होतेच. त्यासाठी यत्न कशाला ? १०१ विक्रीडतोऽमृताम्भोधौ किं क्षुद्रैःखातकोदकैः .६.१२.२२ अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करणाऱ्याला लहानशा खाचेंतील (खळग्यांतील) पाण्याचे काय महत्त्व आहे ! काहीच नाही. १०२ श्रेयः कुर्वन्ति भूतानां साधवो दुस्त्यजासुभिः ॥ ८.२०.७ साधु लोक त्याग करण्यास कठीण आशा प्राणांच्या योगानेही प्राण्यांवर उपकार करितात. १०३ षड्वर्गसंयमैकान्ताः सर्वा नियमचोदनाः ॥ ७.१५.२८ सर्वही नियमविधींचे पर्यवसान कामक्रोधादि सहा शत्रुंचे संयमन करण्यामध्येच आहे. १०४ संसारेऽस्मिन्क्षणार्थोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ११.२.३० एखादा द्रव्याचा निधि प्राप्त झाला असतां जसा आनंद होतो. तसा या संसारामध्ये मनुष्यांना अर्धा क्षणभर सुद्धा घडलेल्या सत्समागमापासून आनंद होतो. १०५ संकीर्त्यमानो भगवाननन्तः श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम् । प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेषं यथातमोऽर्कोऽभ्रमिवातिवातः ॥ १२.१२.४७ ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करितो, किंवा प्रचंड वारा मेघांना वितळून नाहीसे करितो, त्याप्रमाणे भगवान् अनंताचें कीर्तन केले असता, अथवा त्याचा प्रभाव श्रवण केला असता तो भगवान् कीर्तन किंवा श्रवण करणाऱ्या मनुष्यांच्या हृदयांत प्रवेश करून त्यांची सर्व दुःखें नाहींशी करितो. १०६ संनिकर्षोऽत्र मर्त्यानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्याम्भस्तत्रत्यो याति शुद्धये ॥ १०.८४.३१ या लोकीं अत्यंत सहवास असला म्हणजे मनुष्यांना अनादर उत्पन्न होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य शुद्धतेसाठी गंगोदक सोडून दुसऱ्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो. १०७ सम्भावितस्य स्वजनात्पराभवो यदा स सद्यो मरणाय कल्पते ॥ ४.३.२५ संभावित मनुष्याचा आप्तजनांकडून अपमान झाला म्हणजे तो तत्काळ मरणाला कारण होतो १०८ सर्वार्थसंभयो देहो जनितः पोषितो यतः । न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा ॥ १०.४५.५ सर्व पुरुषार्थ संपादन करून देणारा देह ज्यांच्यापासून उत्पन्न झाला, व ज्यांनी त्याचे पोषण केले, त्या आईबापांचे ऋण फेडणं हे शंभर वर्षे जगूनही घडत नाही. १०९ सर्वाश्रमानुपादाय स्वाश्रमेण कलत्रवान् । व्यसनार्णेवमत्येति जलयानैर्यथार्णवम् ॥ ३.१४.१७ ज्याप्रमाणे नावाडी नौकेच्या योगाने दुसऱ्या लोकांसह समुदांतून तरून जातो, त्याप्रमाणे सपत्नीक पुरुष आपल्या गृहस्थाश्रमाच्या योगाने इतर आश्रमी लोकांस बरोबर घेऊन (त्यांना अन्नवस्त्रादिक देऊन ) संकटरूपी सागरांतून तरून जातो. ११० सर्वाः समुद्धरेद्राजा पितेव व्यसनात्प्रजाः ॥ १.१७.४५ ज्याप्रमाणे बाप आपल्या मुलांना संकटांतून सोडवितो त्याप्रमाणे राजाने आपस्या प्रजाजनांना संकटांतून सोडवावे. १११ साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम् । मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि ॥ ९.४.६८ (भगवान् विष्णु दुर्वास ऋषींना म्हणाले ) साधु हे माझें हृदय आहेत ( साधु हे मला फार प्रिय आहेत ) आणि मी साधूंचे हृदय आहे (मी त्यांना फार प्रिय आहे). कारण ते माझ्याहुन दुसरी प्रिय वस्तु कोणती ही जाणत नाहीत आणि मीही त्यांच्याहून प्रिय असलेली दुसरी स्वल्पही वस्तू जाणत नाही. ११२ साधुषु प्रहितं तेजः प्रहतुः कुरुतेऽशिवम् ॥ १.४.६९ साधूंच्या ठिकाणी योजिलेले तेज योजना करणारालाच उलट अनर्थ करिते. ११३ सुखदुःखदो न चान्योऽस्ति यतः स्वकृतभुक् पुमान् ॥ १०.५४.३८ मनुष्याला सुख किंवा दुःख देणारा दुसरा कोणीच नाही. तर तोच आपण स्वतः केलेल्या कर्मानेंच सुख किंवा दुःख भोगीत असतो. ११४ सुलभा युधि विप्रर्षे ह्यनिवृत्तास्तनुत्यजः । न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः ॥ ८.२०.९ (बली शुक्राचार्यांना सांगतो) हे ब्रह्मर्षे युद्धामध्ये परत न फिरता देहाचा त्याग करणारे लोक या लोकी जसे पुष्कळ आतळतात तसे सत्पात्रीं श्रद्धापूर्वक द्रव्य देणारे लोक पुष्कळ आढळत नाहीत. ११५ स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे । गोब्राह्मणार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितम् ॥ ८.१९.४३ स्त्रियांना अधीन ठेवणे, विनोद, विवाह, उपजीविका, प्राणसंकट, गोब्राह्मणांचे हित, आणि हिंसा टाळणे या प्रसंगी असत्य भाषण केले असतां तें निंद्य ठरत नाही. ११६ स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः ॥ १०.४७.५ बांधवांच्या स्नेहाचा संबंध सोडून देणे हे एखाद्या मननशील मुनीला देखील कठीण जाते. ११७ स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः ॥ १.१९.८ सत्पुरुष तीर्थांना स्वतः पवित्र करितात. Encoded and proofread by Mandar Mali aryavrutta at gmail.com
% Text title            : Wise Sayings Subhashita from Shrimad Bhagavata with Marathi Meanings
% File name             : bhAgavatasubhAShitAnimarAThI.itx
% itxtitle              : shrImadbhAgavatasubhAShitAni sArtha marAThI
% engtitle              : bhAgavatasubhAShitAni marAThI
% Category              : subhAShita, subhaashita
% Location              : doc_z_misc_subhaashita
% Sublocation           : subhaashita
% Language              : Marathi
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Transliterated by     : Mandar Mali aryavrutta at gmail.com
% Proofread by          : Mandar Mali aryavrutta at gmail.com
% Translated by         : Vishnu Vinayak Paranjape, Pen 1929
% Indexextra            : (Scan 1, 2, bhAgavatam)
% Latest update         : September 21, 2019
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org